Ahmednagar Drought Crisis : अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळ ! जलसाठे आटले,तीव्र पाणीटंचाईचा सामना

Sonali Shelar
Published:

Ahmednagar Drought Crisis : जिल्ह्यात गेल्या वर्षी पावसाने पाठ फिरविल्यामुळे अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यातील प्रामुख्याने नगर तालुक्यातील बहुतांश गावांत दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र आहेत.

या भागातील जलसाठे आटले असून, ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पर्यायाने या गावांची तहान टँकरवर भागविली जात आहे. त्यातच पाटबंधारे विभागाकडे कमी कर्मचारी असल्यामुळे सर्व कामे करताना त्यांच्या नाकीनऊ येत आहेत.

जिल्ह्यात जानेवारीतच अनेक ठिकाणी पाणी टंचाईची समस्या जाणवण्यास सुरुवात होते. त्यामुळे अशा भागात प्रशासन किंवा खासगी टँकरद्वारे पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. नगर तालुक्यात अनेक मोठ्या लोकवस्तीच्या गावांना लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेल्या तलावांतून पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येतो.

दरम्यान ज्या तलावांतून पाणी योजना करण्यात आलेली असेल, अशा तलावांतून पिण्यासाठीचे पाणी किती, तसेच शेतीच्या सिंचनासाठी किती, याबाबत नियोजन केले जाते. या तलावातून अवैधरित्या पाणी उपसा केला जाऊ नये,

ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी संबंधित तलावावर पाटबंधारे विभागाकडून कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाते. मात्र, सध्या पाटबंधारे विभागाकडे मनुष्यबळाचा मोठा तुटवडा असल्याने अनेक ठिकाणी त्यांना कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

याचा फटका चिचोंडी पाटील गावाला बसत आहे.

गावाला केळ तलावातून पिण्याचा पाणीपुरवठा केला जातो. तलावातून उचललेले पाणी चिचोंडी गावात उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण यंत्रणेद्वारे गावात वितरित केले जाते. सध्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील अनेक नद्या, नाले, विहिरीचे पाणी कमी झाले असून, इतर खोतदेखील कोरडे पडत आहेत.

परिसरात पाणी नसल्याने, तसेच केळ तलावात पाणी उपलब्ध असल्याने या भागातील अनेक शेतकऱ्यांकडून तलावात वीजपंप बसवून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला जात आहे.

आजमितीला तलावात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असून, तो जेमतेम महिनाभर पुरू शकतो, त्यानंतर मात्र ग्रामस्थांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून रहावे लागणार आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

तालुक्यात एकूण १० तलाव असून, यातील ५ तलावांतून पाणी योजना कार्यान्वित आहेत. मात्र, यंदा पावसाने दगा दिल्याने यातील अनेक तलावात पावसाळ्यातच पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाला नव्हता. त्यामुळे उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच या तलावांनी तळ गाठलेला आहे. परिणामी तालुक्यातील काही गावांत सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

तलावात सद्यस्थितीतील पाणीसाठा

बारदरी : एकूण पाणीसाठा ६५.६९, मृत साठा ११.३०, उपयुक्त साठा ५४.३९, सध्याची स्थिती उंबरठा पातळीच्या खाली. कौडगाव : एकूण पाणीसाठा ८७.५८, मृत साठा १३.४२, उपयुक्त साठा ७४.१६, सध्याची स्थिती उंबरठा पातळीच्या खाली. भातोडी एकूण पाणीसाठा १४.४८, मृत साठा ०.०, उपयुक्त साठा १४.४८, सध्याची स्थिती उंबरठा पातळीच्या खाली,

चिचोंडी पाटील एकूण पाणीसाठा ९८.८८, मृत साठा २२.२५, उपयुक्त साठा ७६.३३, सध्याची स्थिती उंबरठा पातळीच्या खाली. देऊळगाव सिद्धी एकूण पाणीसाठा ८२.००, मृत साठा १९.६५, उपयुक्त साठा ६२.३५, सध्याची स्थिती १०.३५. वाळकी : एकूण पाणीसाठा १०८.९१, मृत साठा ४३.०१, उपयुक्त साठा ६५.९०, सध्याची स्थिती उंबरठा पातळीच्या खाली.

दुष्काळात तेरावा महिना

पाटबंधारे विभागाकडे एकूण ७९ पदे मंजूर आहेत. मात्र, सध्या अवघे ३२ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवरच सर्व भिस्त आहे. त्यात सध्या कुकडीचे आवर्तन सुरू असल्याने अवैध पाणी उपसा होऊ नये,

यासाठी काही कर्मचाऱ्यांची नियक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आधीच कर्मचाऱ्यांची संख्या कमी त्यात आणखी ही नवीन जबाबदारी, त्यामुळे या विभागाची अवस्था दुष्काळात तेरावा अशीच झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe