Goat Rearing:- शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसायासोबत फार पूर्वीपासून शेळीपालन व्यवसाय भारतीय शेतकरी करतात. एक ते दोन शेळ्यांचे पालन शेतकऱ्यांकडून या अगोदर केले जात होते. परंतु आता शेळीपालन व्यवसाय व्यावसायिक दृष्टिकोनातून केला जातो.
त्यातल्या त्यात अनेक उच्चशिक्षित तरुण शेतीकडे वळले असून जोडधंदाच्या स्वरूपामध्ये बहुतेक तरुण आता शेळीपालन व्यवसायाला पसंती देत आहेत. शेळीपालन व्यवसाय म्हटला म्हणजे कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी जागेत करता येणारा व्यवसाय असून त्यामानाने मात्र आर्थिक नफा जास्त देणारा व्यवसाय आहे.

शेळीपालन व्यवसाय यशस्वी करण्यासाठी आपल्याला प्रत्येक गोष्टीने व्यवस्थापन काटेकोर ठेवणे खूप गरजेचे असते. परंतु त्यासोबतच शेळीपालनामध्ये दर्जेदार जातिवंत जातीच्या शेळ्यांची निवड शेळीपालनासाठी करणे देखील तितकेच गरजेचे असते.
जर शेळीच्या जाती या दर्जेदार किंवा जातिवंत नसतील तर मात्र तुम्ही कितीही व्यवस्थापन केले तरी त्यापासून तुम्हाला अपेक्षित नफा किंवा फायदा मिळू शकत नाही. याकरिता तुम्ही शेळीपालन व्यवसाय सुरू करण्याआधी तुम्हाला कोणत्या जातीच्या शेळ्यांचे पालन करायचे आहे याचा विचार करणे खूप गरजेचे आहे.
पाहायला गेले तर शेळ्यांच्या भरपूर जाती आहेत. परंतु त्यामध्ये काही मोजक्या जाती या शेळीपालनासाठी उपयुक्त असून आर्थिक फायदा देणाऱ्या देखील आहेत. अगदी याच मुद्द्याला धरून आपण या लेखामध्ये शेळीच्या एका जातीची माहिती घेणार आहोत. जी शेळीपालनासाठी अत्यंत उपयुक्त आणि दर्जेदार जात म्हणून ओळखली जाते.
जमुनापरी शेळी आहे शेळीपालनासाठी फायद्याची
जमुनापारी शेळी ही भारतातील प्रामुख्याने यमुना नदीच्या आसपासचा जो काही परिसर आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाळली जाणारी शेळीची जात आहे व यामुळे तिला जमुनापारी हे नाव पडले आहे. हरियाणा तसेच पंजाब, बिहार, राजस्थान आणि मध्य प्रदेश राज्यांमध्ये ही सर्वाधिक प्रमाणात आढळून येते.
जमुनापारी शेळीचे वैशिष्ट्य म्हणजे या शेळी पासून जास्त प्रमाणामध्ये मांस उत्पादन व दुधाचे उत्पादन मिळते. त्यामुळे जर शेडची व्यवस्थित उभारणी करून जमुनापारी शेळीची पालनासाठी निवड केली तर शेळीपालनातून खूप चांगल्या पद्धतीचा नफा मिळणे शक्य आहे.
जमुनापारी शेळीचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये
जर आपण या शेळीच्या जातीचा संपूर्ण जीवन काळ पाहिला तर त्यामध्ये ती साधारणपणे 13 ते 15 पिलांना जन्म देते व या शेळीचे वजन इतर शेळींच्या प्रजातींपेक्षा जास्त असते. जमुनापारी शेळीच्या बोकडाचे वजन पाहिले तर ते 70 ते नव्वद किलोच्या दरम्यान तर मादी शेळीचे वजन 50 ते 60 किलो इतके असते.
तसेच या शेळीच्या दुधामध्ये मोठ्या प्रमाणावर खनिजे व सॉल्टचे प्रमाण असते. ही शेळी दररोज दोन ते तीन लिटर पर्यंत दूध देते व हिचे दूध अनेक औषधी गुणधर्मांनी युक्त आहे.
शारीरिक वैशिष्ट्यांच्या बाबतीत पाहिले तर ही शेळी पांढऱ्या रंगाची असते व हिच्या पाठीवर लांब केस आणि छोटे शिंग असतात. तसेच कान मोठे आणि काहीसे दुमडलेले आकाराचे असतात. इतर शेळीच्या जातींपेक्षा ही जात काहीशी लांब आणि दिसायला उंच दिसते.
किती असते जमुनापारी शेळीची किंमत?
तुम्हाला देखील शेळीपालन व्यवसायासाठी जमुनापारी प्रजातीची शेळी घ्यायची असेल तर साधारणपणे एक शेळी 15 ते 20 हजार रुपयाला मिळते.