Ahmednagar Politics : काल भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यामुळे आता लवकरच लोकशाहीचा महा कुंभ सजणार आहे. लवकरच लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहेत. यामुळे, नगर दक्षिण मधून महायुतीतील भाजपाचे खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला आहे.
यावर खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत आपली रणनीती काय आहे असा प्रश्न उपस्थित केल्यावर खासदार महोदय यांनी असे म्हटले आहे की, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची तयारी पूर्ण झाली आहे.
तयारी ही कधीच शेवटच्या टप्प्यात केली जाऊ शकत नाही या मताचा मी आहे. पाच वर्षे प्रदीर्घ संघर्ष करून विकासकामे केली आहेत, मार्गी लावली आहेत. त्यामुळे तयारी पूर्ण आहे. रणनीती चॅनलवर सांगायची झाली तर ती रणनीतीच नाही. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची रणनीती फार पूर्वीपासून आखली जाते.
यामुळे पूर्वीपासून आखलेली रणनीती टीव्हीवर सांगण्यापेक्षा जेव्हा निकाल लागतो तेव्हा ती बाहेर येते. आदरणीय प्रधानमंत्री मोदी यांच्या आणि महायुतीच्या काळात सकारात्मक कामे झाली आहेत. यामुळे मला कुठल्याही प्रकारची अडचण वाटत नाहीये.
निलेश लंके यांच्याकडे कसे पाहता ?
सध्या नगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीकडून विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार निश्चित झालेला नसला तरीदेखील राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाकडून पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यात लोकसभेसाठी लढाई होणार असे चित्र आहे. दरम्यान याच संदर्भात भाजपाचे अधिकृत उमेदवार सुजय विखे पाटील यांना प्रश्न विचारला होता.
यावर त्यांनी जोपर्यंत एबी फॉर्म लावून माघारची तारीख संपत नाही तोपर्यंत उमेदवार निश्चित नसतो, हे राजकारण आहे. त्याचबरोबर अधिकृत जागावाटप झाल्यानंतर जेव्हा अधिकृत उमेदवार जाहीर होईल तेव्हा तोच उमेदवार दिसेल ज्याची सध्या चर्चा आहे तेव्हा मी त्याच्यावर बोलेल.
आज अजून कसलंच काही नाही. जेव्हा मला तिकीट मिळालं नव्हतं तेव्हा आमच्याकडेही अनेक मान्यवरांनी इच्छा व्यक्त केली होती. पण पक्षाने मला संधी दिली आहे. यामुळे सर्व काही घडू देत मग त्यावर भाष्य करू, असे विखे यांनी यावेळी म्हटले आहे.
विखे आणि लंके अशी लढत होणार, या चर्चेकडे कसं पाहता
मी चर्चेला उत्तर देत नाही रे बाबा. चर्चा कोण करत ? एक तर आपले पत्रकार बंधू चर्चा करतात. त्यांनी ती केली पण पाहिजे. जर तर वर राजकारण होत नाही. कार्यकर्त्यांच्या म्हणण्यावर राजकारण होत नाही. अधिकृतपणे कागदावर येऊ द्या मग मी त्याच्यावर नक्कीच कमेंट करेल असे यावेळी सुजय विखे पाटील यांनी म्हटले.
सर्व्हेकडे कसे पाहता ?
महाराष्ट्रात अनेक सर्व्हे फेल झाले आहेत. अनेक एक्झिट पोल फेल झाले आहेत. हे तर प्री पोल सर्व्हे आहेत. त्यामुळे याबाबत निकालाच्या दिवशी समजेल. राज्यात महायुतीला 40 पेक्षा अधिक जागा येतील आणि देशात NDA ला 400 पेक्षा अधिक जागा येतील असा मला विश्वास असल्याचे सुजय विखे पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.
नगर दक्षिणच काय होणार
नगर दक्षिणचा मी उमेदवार आहे. यामुळे मी सकारात्मक चित्र बघणार आहे. नगर दक्षिण मध्ये सकारात्मक घडले पाहिजे अशीच माझी इच्छा राहणार आहे. शेवटी जनतेला काय हवं आहे ? हे जनतेला ठरवायचं असत. जनतेला विकास हवा असेल तर मला असं वाटतं की, विकासाच्या बाबतीत पूर्ण राज्यात नगर दक्षिणमध्ये सार्वत्रिक विकास झालेला आहे. विकासाच्या बाबतीत येथे निवडणूक सुद्धा झाली नाही पाहिजे.