पाथर्डी : उन्हाची तीव्रता वाढत असून, गंभीर पाणीटंचाईचे चित्र डोळ्यासमोर असताना लघुपाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे तालुक्यातील कुत्तरवाडी मध्यम प्रकल्पातून बेसुमार पाणी उपसा होत असल्यामुळे या प्रकल्पाने तळ गाठला आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील टँकरसाठीचा उद्भव कोठे राहील, याचा अंदाज प्रशासनाने घेतलेला नाही.
तालुक्याच्या पूर्व भागासाठी वरदान ठरलेला कुत्तरवाडी मध्यम प्रकल्प गेल्या पावसाळ्यात पूर्णपणे भरलेला एकमेव प्रकल्प आहे. परिसरातील पंधरा गावांना याचा अप्रत्यक्षपणे सिंचनासाठी ‘लाभ होऊन आजही अनेक विहिरींना मुबलक पाणी आहे.

जानेवारीअखेर तलावातील पाणी कागदोपत्री राखीव ठेवले, प्रत्यक्षात परिसरातील शेतकऱ्यांनी अवैधपणे तलावाच्या पाण्यात वीज पंप लावून पाण्याचा अहोरात्र उपसा केल्याने टंचाई काळात वरदान ठरणारा हा प्रकल्प अखेरच्या घटका मोजत आहे.
कुणी किती व कधी पाणी घ्यायचे, यावर कोणाचे नियंत्रण नाही, जबाबदार अधिकाऱ्यांकडून राखीव पाणीसाठ्याची पाहणी झालेली नाही. अशाच पद्धतीने पाणीउपसा होत राहिल्यास जेमतेम पंधरा दिवसात प्रकल्प पूर्णपणे कोरडाठाक होईल.
तालुक्याच्या पूर्व भागातील सुमारे ५० गावांसाठी बीड जिल्ह्यातील दहा गावांसाठी टंचाईचे टँकर भरण्याचा शाश्वत उद्भव म्हणून याकडे पाहिले जाते. पाणी टंचाईच्या काळात मोहटा देवस्थानसाठी टँकर येथूनच भरण्याची सुविधा शासनाने यापूर्वी केली होती.
कमी अधिक प्रमाणात तालुक्यातील ज्या प्रकल्पामध्ये पाण्याचा मृतसाठा उरला आहे, त्या सर्व प्रकल्पांची परिस्थिती अशीच आहे. सध्या तालुक्याचे टंचाईचे टँकर जायकवाडी योजनेच्या अमरापूर साठवण टाकी व पांढरीपुल येथून भरले जातात.
यामुळे नळपाणीपुरवठा योजनेचे वेळापत्रक कोलमडले असून, पाथर्डी शहराला आता पाच ते सात दिवसांतून एक वेळ अवघे चाळीस मिनिटे पाणीपुरवठा होतो. पाणीटंचाईची भीषणता व उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत असताना
पाटबंधारे विभाग लघुपाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे पिण्याच्या पाण्यासाठी तालुक्यातील अनेक गावांना स्थलांतराचा दिवस दूर नाही. एवढी भीषण परिस्थिती आहे. जिल्हाधिकार्यांनी सर्वच तलावांतून विनापरवाना पाणी उपसा करणारे वीजपंप जप्त करावेत, अशी मागणी होत आहे.