Women Success Story:- सध्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून यशस्वीपणे उभ्या असून देशाचे संरक्षण क्षेत्र असो की, विमानाच्या पायलट, अगदी इस्रो सारख्या संस्थांमध्ये देखील महत्वाच्या पदांवर आता महिला आहेत.
आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांच्या श्रेणीमध्ये देखील गेल्या काही वर्षांमध्ये महिला मोठ्या प्रमाणावर कर्तुत्व पार पाडताना आपल्याला दिसून येत आहेत.यामध्ये कृषी क्षेत्र देखील मागे राहिलेले नाही.

कृषी क्षेत्रामध्ये देखील अनेक महिला शेतामध्ये खूप वेगाने प्रगती करत असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती करत त्या माध्यमातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवताना आपल्याला दिसून येत आहेत.
अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण उत्तर प्रदेश राज्यातील पुनम सिंह यांची यशोगाथा पाहिली तर त्यांनी पतीसोबत शेती करत असताना शेतीला जोडधंदा म्हणून स्वतः गांडूळ खत उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार गांडूळ खत बनवायला सुरुवात केली.
आज पूनम यांनी स्वतःसाठी आर्थिक स्त्रोत निर्माण केलाच परंतु त्यासोबत इतर महिलांना देखील रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. गांडूळ खत विक्रीतून पूनम सिंह वर्षाला तब्बल आठ लाखांपर्यंत आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत.
पुनम सिंह यांनी गांडूळ खत विक्रीतून साधली आर्थिक समृद्धी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, उत्तर प्रदेश राज्यातील सुलतानपूर जिल्ह्यात असलेल्या हडहा या गावच्या पूनम सिंह या पतीसोबत शेती व्यवसाय करत असताना त्यांना काहीतरी शेतीला जोडधंदा करावा या इच्छेतून गांडूळ खत निर्मितीची कल्पना सुचली.
ही कल्पना सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले व गांडूळ खत उद्योग सुरू केला. गेल्या तीन वर्षापासून पूनम या गांडूळ खताचे उत्पादन घेत असून त्यांच्यासोबत इतर महिलांना देखील त्यांनी सहभागी करून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे.
या व्यवसायाच्या मागे असलेली प्रेरणा सांगताना पुनम म्हणतात की, रासायनिक खतांचा आरोग्यावर होणारा दुष्परिणाम पाहता व यामुळे अनेक लोकांना वेगवेगळ्या आजारांनी ग्रासलेले पाहून शेतीसाठी सेंद्रिय खते बनवण्याचे त्यांनी ठरवले व गांडूळ खत व्यवसायाला सुरुवात केली.
कितीला करतात गांडूळ खताची विक्री?
पुनम सिंह यांनी हा उद्योग सुरू केल्यानंतर गांडूळ खत तयार केले व ते स्वतःच्या शेतामध्ये अगोदर वापरले. त्यानंतर गव्हाचे पीक उत्तम पद्धतीने आल्यानंतर त्यांनी हळूहळू हा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न केले व व्यवसाय वाढीस लावला.
आज जवळपास गावातील अकरा महिला एकत्र येऊन त्यांनी हा व्यवसाय सुरू केला असून आजूबाजूच्या परिसरामध्ये दिवसेंदिवस गांडूळ खताची मागणी वाढत असल्याने त्यांना चांगल्या प्रकारे या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळत आहे.
आता शेतकरी गांडूळ खताचा वापर करून कमीत कमी खर्चात पिकांचे जास्त उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत. पुनम या 25 किलो गांडूळ खताची बॅग 600 ते 700 रुपयांना विकतात. विशेष म्हणजे पूनम यांच्या गांडूळ खत प्रकल्पाच्या माध्यमातून दररोज दोन ते तीन क्विंटल गांडूळ खत तयार होते व ते अगदी सहजपणे विकले देखील जाते.
पुनम यांच्या या व्यवसायातून शेतीला तर फायदा झालाच परंतु हळूहळू हा व्यवसाय वाढीस लागल्यामुळे अनेक महिलांना रोजगार मिळाल्याने त्यांचा घरखर्च देखील भागला. आज पूनम सिंह या व्यवसायाच्या माध्यमातून एका वर्षाला सात ते आठ लाख रुपयापर्यंत आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत.