कर्जत एमआयडीसीचा प्रश्न राजकीय वादात आता खंडपीठात गेला असून, पाटेगाव, या ग्रामपंचायतीने थेट याचिका दाखल करत उद्योगमंत्र्यांसह एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना महसूलच्या अधिकाऱ्यांना पार्टी केले असून,
ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दाखल करून घेतली असल्याची माहिती अॅड. कैलास शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी पाटेगावच्या सरपंच मनीषा कदम, उपसरपंच नामदेव लाड, सह प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.
कर्जत-जामखेड मतदारसंघात एमआयडीसीच्या जागेच्या निश्चितीवरून जोरदार रणकंदन माजले असताना आरोप प्रत्यारोपांसह जोरदार राजकारण सुरू असून, महविकास आघाडी सरकारने एमआयडीसीसाठी पाटेगाव-खंडाळा हद्दीतील ४५८ हेक्टर प्रस्तावित जागा निश्चित केली असताना सत्ता बदलानंतर माजीमंत्री आ. राम शिंदे यांनी राजकारण करत पाटेगाव ग्रामपंचायतीच्या ठरावाचा चुकीचा अर्थ काढून
ही जागा रद्द करण्यास महायुतीच्या सरकारला भाग पाडले व नवीन जागा थेरगाव कोंभळी परिसरात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, असा गंभीर आरोप अॅड. कैलास शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत करताना याविरुद्ध आपण स्वतः खंडपीठात याचिका दाखल केली होती.
मात्र, यावर कोर्टाने आपण वैयक्तिक याचिका दाखल का करत आहात, अशी विचारणा केल्यानंतर माझी याचिका मागे घेऊन सरपंच मनीषा कदम यांनी ग्रामपंचायत पाटेगाव यांच्या वतीने दुसरी याचिका दाखल केलेली याचिका औरंगाबाद खंडपीठाने मान्य करत दाखल करून घेतली असल्याची माहिती अॅड. कैलास शेवाळे यांनी दिली.
वास्तविक पाहता पाटेगाव ग्रामपंचायतीने फक्त निवासी जागा आणि बागायती क्षेत्र वगळून एमआयडीसीसाठी जागा भूसंपादन करावी, असा ठराव घेतला होता. मात्र, त्यास चुकीच्या पद्धतीने समोर आणत माजीमंत्री राम शिंदेंनी ती जागा बदलली, असा आरोप अॅड. कैलास शेवाळे यांनी या वेळी केला.
कर्जत- जामखेड एमआयडीसीसाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून आमदार रोहित पवारांनी पाटेगाव-खंडाळा जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र, राज्यात सरकार बदलले आणि त्यास आ. राम शिंदेंनी खीळ घालण्याचे काम केले.
वास्तविक पाहता सदरची जागा दोन्ही तालुक्यांच्या विकासासाठी योग्य असताना केवळ राजकीय विरोध म्हणून आम्ही निवासी जागा आणि बागायती क्षेत्र वगळून जागा संपादन करावी, हा ग्रामसभेचा ठराव आमदार शिंदेंनी चुकीच्या पद्धतीने मंत्रिमंडळ आणि उद्योग विभागासमोर मांडल्याने त्यास विरोध दर्शविणे चुकीचे आहे.
पत्रकार परिषदेस सरपंच मनीषा कदम, उपसरपंच नामदेव लाड, बाजार समितीचे संचालक हर्षल शेवाळे, दादासाहेब पाटील, जान्हवी शेवाळे, सतीश डुकरे, गोकुळ इरकर, परशुराम लाड, सोपान जाधव, महादेव शिंदे, सत्यवान भंडारे, योगेश झिंजे, बंडू इरकर, नवनाथ डुकरे, सतीश बेलकर, सचिन सुरवसे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते.