Nitesh Karale Guruji : भारतीय निवडणूक आयोगाने नुकत्याच दोन दिवसांपूर्वी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. अर्थातच लोकशाहीचा महाकुंभ खऱ्या अर्थाने आता सजला आहे.
या लोकशाहीच्या महाकुंभात अर्थातच लोकसभेच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांच्या माध्यमातून आणि राजकीय नेत्यांच्या माध्यमातून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. या लग्नाच्या हंगामात आता निवडणुकीची लगीन घाई पाहायला मिळत आहे.
इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून आपल्या पक्षाकडे तिकिटांसाठी फिल्डिंग लावली जात आहे. दुसरीकडे राज्यात महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये अजूनही तिकिटावरून फायनल निर्णय झालेला नसल्याचे पाहायला मिळतय.
महायुतीकडून भारतीय जनता पक्षाने फक्त आपल्या 20 उमेदवारांची नावे अधिकृतरित्या जाहीर केली आहेत. इतर कोणत्याच पक्षाने अजून महाराष्ट्रातील अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत.
तथापि इच्छुक उमेदवारांनी तयारी मात्र जोरात सुरू केली आहे. अशातच वर्धा लोकसभा मतदारसंघातून नितेश कराळे गुरुजींनी निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवलेली आहे.
नितेश कराळे गुरुजी हे विदर्भातील वऱ्हाडी बोलीभाषेत आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देत आहेत. विदर्भातील त्यांची वऱ्हाडी बोलीभाषा आणि शिकवण्याची त्यांची जगावेगळी शैली विद्यार्थ्यांना खूपच आवडते.
यामुळे ते सोशल मीडियावर देखील खूपच प्रसिद्ध आहेत. त्यांचे लेक्चर youtube वर उपलब्ध असून त्यांचे व्हिडिओज नेहमीच व्हायरल होत असतात. दरम्यान, सोशल मीडियावरील हे स्टार गुरुजी आता लोकसभेच्या आखाड्यात उतरण्यास इच्छुक आहेत.
त्यांनी महाविकास आघाडीकडून कोणत्याही पक्षाकडून उभे राहण्याची तयारी दाखवलेली आहे. यासाठी त्यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सुप्रीमो शरद पवार यांची भेट घेतली आहे.
यामुळे सध्या नितेश कराळे गुरुजींची राजकारणात देखील मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. यामुळे नितेश कराळे गुरुजी नेमके कोण आहेत ? त्यांचा राजकीय इतिहास काय आहे ? हे आज आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोण आहेत कराळे गुरुजी ?
नितेश कराळे गुरुजी हे वर्धा जिल्ह्यातील मांडवा येथील एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेत. कराळे गुरुजींनी बीएससी, बीएडचे शिक्षण घेतलेले आहे. शिक्षणानंतर त्यांनी काही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला होता.
मात्र त्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळाले नाही. परंतु ते खचले नाहीत. त्यांनी पुणेरी पॅटर्न नावाने क्लासेस सुरू केलेत. ते आपल्या क्लासेसमध्ये वऱ्हाडी भाषेमध्ये शिकवण्यास प्राधान्य देऊ लागलेत.
यामुळे वऱ्हाडी मुलांना तर त्यांची ही शैली आवडलीच पण राज्यातील इतरही भागातील विद्यार्थ्यांना त्यांची ही शैली आवडू लागली. त्यांनी आपल्या क्लासेसला मिळत असलेला प्रतिसाद पाहता फोनिक्स अकादमी नावाची अकॅडमी सुरू केली. मात्र कोरोना आला आणि सार काही बंद झालं.
कोरोना काळात त्यांनी गुगल मीट आणि झूम मीटिंगच्या मदतीने आपल्या विद्यार्थ्यांना शिकवले. पुढे त्यांनी आपले यूट्यूब चैनल सुरू केले आणि त्यावर व्हिडिओ पोस्ट करू लागलेत. या व्हिडिओजला मात्र विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि इथूनच खऱ्या अर्थाने विदर्भातील वऱ्हाडी भाषेत शिकवणारे कराळे गुरुजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले.
फक्त विद्यार्थीच नाही तर पालकही त्यांचे व्हिडिओज आवर्जून पाहतात. यामुळे विदर्भासहित राज्यातील इतरही भागात कराळे गुरुजींची प्रसिद्धी पाहायला मिळते. कराळे गुरुजी शिक्षणासोबतच समाजकारणात देखील गुंतलेले आहेत. त्यांनी मध्यंतरी शेतकरी आंदोलनात सहभाग घेतलेला होता.
विशेष म्हणजे त्यांनी याआधी देखील राजकारणात हात आजमावला आहे. नागपूर पदवीधर मतदार संघाच्या 2020 च्या निवडणुकीत कराळे गुरुजी उभे राहिले होते. त्यावेळी ते अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले होते आणि त्यांना अवघे आठ हजार पाचशे मते मिळवता आलीत.
आता मात्र त्यांनी थेट लोकसभा लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. यामुळे कराळे गुरुजींना महाविकास आघाडीकडून तिकीट मिळणार का हे पाहण्यासारखे राहणार आहे. महाविकास आघाडी वर्धा लोकसभा मतदारसंघातून नितेश कराळे गुरुजींना संधी देणार का ?
जर त्यांना महाविकास आघाडीने तिकीट दिले नाही तर ते अपक्ष उभे राहणार का ? तसेच गेल्या तीन ते चार वर्षात आपल्या वऱ्हाडी भाषेतून युट्युबवर हजारो, लाखो विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या कराळे गुरुजींना राजकारणात यश गावणार का ? ही देखील गोष्ट पाहण्यासारखी राहणार आहे.