Marathi News : अमेरिकेच्या शिकागो शहरातून सोमवारपासून राम मंदिर रथ यात्रेला सुरुवात होत आहे. ६० दिवस चालणाऱ्या या यात्रेदरम्यान ४८ राज्यांमधून १२,८७४ किमीचा प्रवास करण्यात येणार आहे.
या यात्रेदरम्यान अमेरिकेतील ८५१ तर कॅनडातील १५० मंदिरांना भेट दिली जाणार आहे. अमेरिकेच्या विश्व हिंदू परिषदेतर्फे (व्हीएचपीए) या रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या यात्रेसाठी टोयोटा सिएना व्हॅन सजवली असून, त्यावरील रथात भगवान श्रीराम, देवी सीता, लक्ष्मण व हनुमानाच्या मूर्ती ठेवल्या आहेत. यासोबतच अयोध्येतील राम मंदिरातून आणलेला विशेष प्रसाद व प्राणप्रतिष्ठावेळी पूजेचा अक्षता कलश या रथात असेल, अशी माहिती व्हीएचपीएचे महासचिव अमिताभ मित्तल यांनी दिली.
अयोध्येतील राम मंदिर प्रत्यक्षात साकारल्यामुळे जगभरातील १.५ अब्जांहून अधिक हिंदूंना मनस्वी आनंद झाला असून, हिंदू समुदायात नवी ऊर्जा व विश्वास संचारला आहे. या राष्ट्रव्यापी रथ यात्रेची सुरुवात २५ मार्च रोजी शिकागोतून होईल. १२,८७४ किमीच्या रथ यात्रेदरम्यान अमेरिकेतील ८५१ तर कॅनडातील जवळपास १५० मंदिरांना भेट दिली जाणार आहे.
कॅनडातील रथ यात्रेचे आयोजन ‘कॅनडा विश्व हिंदू परिषदेतर्फे केले जाणार असल्याचे मित्तल यांनी सांगितले. या यात्रेची संकल्पना व आयोजनात मदत करण्यासाठी अनेक स्वयंसेवकांनी व्हीएचपीएकडे नाव नोंदणी केली आहे. या रथ यात्रेचा समारोप हनुमान जयंतीदिनी २३ एप्रिल रोजी इलिनोइसच्या शुगर ग्रोव येथे होणार असल्याचे मित्तल म्हणाले.
हिंदू धर्माबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे, त्यांना शिक्षित व सशक्त करणे हा राम मंदिर रथ यात्रेचा उद्देश असल्याचे ‘हिंदू मंदिर सशक्तीकरण परिषद (एचएमईसी) या संस्थेचे प्रमुख तेजल शाह यांनी नमूद केले. या यात्रेमुळे हिंदू समुदायाच्या लोकांना एकत्र येण्याची संधी मिळणार आहे.