BJP Candidate List Maharashtra : राज्यातील भाजप उमेदवारांची आज दुसरी यादी येणार

Ahmednagarlive24
Published:
Bjp In Maharashtra

राज्यातील भाजप उमेदवारांची दुसरी यादी शनिवारी रात्रीपर्यंत जाहीर होणार आहे. त्यापूर्वी राज्यातील भाजप नेत्यांनी शुक्रवारी दिवसभर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर काथ्याकूट सुरू होता.

सोबतच उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांची सागरवर रांग लागल्याचे दिसले. शनिवारी दुपारी दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय निवडणूक समिती कार्यकारिणीची उमेदवार निवडीसाठी बैठक होत आहे. त्यानंतर भाजप राज्यातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करेल.

लोकसभा उमेदवारीसाठी सध्या भाजपसह महायुतीतील अनेक नेते इच्छुक आहेत. मात्र शिंदे गटातील अनेक नेत्यांनी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी फडणवीस यांच्याकडे फेऱ्या मारणे सुरू केले आहे. यवतमाळ-वाशिममधून मंत्री संजय राठोड इच्छुक आहेत. त्यांनी फडणवीस यांची भेट घेऊन आपली दावेदारी भक्कम केली.

दुसरीकडे विद्यमान खासदार भावना गवळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मला शब्द दिल्यानुसार आपल्यालाच उमेदवारी मिळावी असे गाऱ्हाणे गायले. हिंगोलीतून इच्छुक असलेले बबनराव लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकर यांच्यासह फडणवीस यांची भेट घेऊन हा मतदारसंघ भाजपला घ्यावा, अशी मागणी केली.

दक्षिण मुंबईतून इच्छुक असलेले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, रामटेकचे शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने, अमरावतीतून इच्छुक शिंदे गटाचे अभिजीत अडसूळ, संभाजीनगरमधून इच्छुक असलेले भागवत कराड यांनी फडणवीस यांची भेट घेऊन उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे शब्द टाकावा, अशी विनंती केली. कृपाल तुमाने आणि अभिजीत अडसूळ या शिंदे गटाच्या नेत्यांनी भाजपच्या कमळ चिन्हावर लढण्याची तयारी दाखवली आहे.

मराठवाड्यातील धाराशिव लोकसभा मतदारसंघातून निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत. त्या पार्श्वभूमीवर, परदेशी यांच्यासह माजी खासदार रवी गायकवाड, आमदार अभिमन्यू पवार, राणा जगजितसिंह पाटील आदींना फडणवीस यांनी बोलावून घेतले होते. परदेशी यांना उमेदवारी दिल्यास तेथील राजकीय परिस्थितीचा अंदाज फडणवीस यांनी घेतला.

धाराशिवमधून भाजपकडून काँग्रेसमधून भाजपवासी झालेले बसवराज पाटील हेसुद्धा इच्छुक आहेत, पण त्यांचे नाव आता मागे पडल्याचे सांगण्यात आले. पुण्यातून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या जगदीश मुळीक यांनी फडणवीस यांची भेट घेतली. पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी बोलावलेल्या बैठकीला मुळीक यांनी दांडी मारल्याने फडणवीस यांनी मुळीक यांना सुनावल्याचे समजते.

दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून भाजपकडून रवींद्र चव्हाण यांचे नाव पुढे आले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी नकार दिल्यानंतर शिंदे गटाकडून किरण सामंत यांनी दावेदारी केली. पण ही जागा भाजप आपल्याकडे घेण्यास इच्छुक आहे, त्यामुळे चव्हाण यांचे नाव समोर आले. पण किरण सामंतांनी कमळ चिन्हावर लढण्याची तयारी दाखवल्यास त्यांच्या नावाचाही विचार होण्याची शक्यता आहे.

संभाव्य उमेदवारांबाबत भाजप कमिटीत चर्चा
भाजपच्या कोट्यातील मुंबईसह राज्यातील उर्वरित उमेदवार ठरवण्यासाठी भाजप कोअर कमिटीतील नेत्यांची शुक्रवारी सागर बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी संभाव्य उमेदवारांबाबत फडणवीस यांनी उपस्थित नेत्यांसोबत चर्चा केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe