बीडमध्ये एका महिलेसह दोन मुलांची निर्घृणपणे हत्या झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे.
संगीता संतोष कोकणे (वय ३१), संदेश संतोष कोकणे (अंदाजे वय १०), मयूर संतोष कोकणे (वय ७) अशी मृतांची नावे आहेत. बीड शहरात रविवारी दुपारी पेठ भागात आई आणि मुलाचे मृतदेह एका खोलीत रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले.
तर मयूर या सात वर्षांच्या मुलाचा मृतदेह पाण्याच्या बॅरलमध्ये आढळून आला. दगड आणि बॅटने माय- लेकाचा खून झाला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे.
घरातील काही कपडेही रक्ताने माखले होते. घटनेची माहिती कळताच पेठ बीड पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
उपविभागीय पोलिस अधिकारी भास्कर सावंत , स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली. या हत्याकांडाचे कारण उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.
मात्र, ही घटना कौटुंबिक वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज असून पोलिसांनी मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे.