Ahmednagar Loksabha : लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटीलच खासदार होणार ? ‘ही’ आहेत प्रमुख कारणे

Tejas B Shelar
Updated:
Sujay Vikhe News

Ahmednagar Loksabha : अहमदनगर जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ. या दोन्ही जागांवर आता महायुतीकडून आणि महाविकास आघाडी कडून आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा झालेली आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर ही जागा महायुतीकडून भाजपाच्या वाट्याला आली आहे. या जागेवर भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना संधी देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून या जागेसाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खरे तर भाजपाने आपल्या उमेदवाराची घोषणा केल्यानंतर त्यावेळी महायुतीत असलेल्या निलेश लंके यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा बोलून दाखवली होती.

यामुळे ते लवकरच अजितदादा यांची साथ सोडतील आणि शरद पवार यांच्या गटात सामील होतील अशा चर्चा होत्या. घडले देखील तसेच निलेश लंके यांनी पुन्हा एकदा मोठ्या साहेबांकडे म्हणजे शरद पवार यांच्या गटाकडे धाव घेतली आहे. दरम्यान शरद पवार यांच्या गटात सामील झाल्यानंतर त्यांना महाविकास आघाडीकडून या जागेची अधिकृत उमेदवारी सुद्धा मिळालेली आहे. यंदाची लोकसभा निवडणूक विद्यमान खासदार सुजय विखे पाटील आणि माजी आमदार निलेश लंके यांच्यात होणार आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा सुजय विखे पाटील हेच विजयी होणार असा दावा काही राजकीय विश्लेषकांच्या माध्यमातून होत आहे. अशा परिस्थितीत, आज आपण सुजय विखे पाटील यांचे पारडे निलेश लंके यांच्या पेक्षा वजनदार का आहे हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

सुजय विखे पाटील निवडून येण्यासाठी पूरक परिस्थिती

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा 1952 ते 1996 या काळात काँग्रेसच्या ताब्यात होता. या कालावधीमध्ये येथून काँग्रेसचचा उमेदवार निवडून यायचा. यामुळे तेव्हा या लोकसभा मतदारसंघाला काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जात असे. 1998 ला मात्र येथे मोठा उलटफेर पाहायला मिळाला. त्यावेळी युतीमध्ये समाविष्ट असलेल्या शिवसेनेकडून या जागेवर बाळासाहेब विखे पाटील यांनी विजयाचा नारळ फोडला. यानंतरच्या काळात मात्र भाजपाने या काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला भाजपाचा बालेकिल्ला बनवण्यात यश मिळवले. कारण की भारतीय जनता पक्षाकडून दिलीप गांधी यांनी या लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदारकी भूषवली. 2014 मध्ये ज्यावेळी पहिल्यांदा तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदावर विराजमान झालेत त्यावेळी सुद्धा दिलीप गांधी यांनी भरघोस मतांनी या मतदारसंघातून विजयी सलामी दिली.

पुढे 2019 मध्ये मात्र भारतीय जनता पक्षाने या जागेवरून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्याचा मोठा निर्णय घेतला. खरेतर 2019 मध्ये सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. त्यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला आणि बीजेपीने त्यांना या जागेवरून 2019 मध्ये पहिल्यांदा खासदारकीचे तिकीट दिले. विशेष म्हणजे सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसमधून भाजपा मध्ये एन्ट्री घेतलेली असतानाही स्वबळावर, स्वतःच्या यंत्रणेचा योग्य वापर करून या जागेवरून पहिल्यांदाच विजयाचा नारळ फोडला. त्यांनी 2019 मध्ये तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप यांचा विक्रमी मताधिक्यांनी पराभव केला. आता मात्र संग्राम जगताप हे सुजय विखे यांच्या प्रचारात दंग आहेत.

यामुळे आगामी निवडणुकीत याचा देखील त्यांना फायदा होणार आहे. भारतीय जनता पक्षाने तरुण-तडफदार, सुशिक्षित नेतृत्व म्हणून डॉक्टर सुजय विखे पाटील यांना संधी दिली होती आणि त्यांनी या संधीचे सोने बनवले. त्यांच्या विजयात त्यांचे वडील तत्कालीन काँग्रेसचे नेते अन सध्याचे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील महत्वाची भूमिका निभावली होती. त्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते, मात्र आपल्या मुलासाठी त्यांनी खूपच मेहनत घेतली. सुजय विखे विजयी झालेत आणि नंतर त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील हे देखील भाजपामध्ये आलेत. विजयानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नगर दक्षिणमध्ये अनेक महत्त्वाची विकासकामे केलीत.

त्यांनी नगर शहरात तयार होत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामातही महत्त्वाची भूमिका बजावली. विविध विकास कामांच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या मतदारसंघात चांगला दांडगा जनसंपर्क तयार केला आहे. शिवाय त्यांची एक स्वतःची यंत्रणा आहे जी की वेळोवेळी त्यांना फीडबॅक देत असते. त्यांनी गेल्या पाच वर्षाच्या काळात आपल्या मतदारसंघात विधानसभा मतदारसंघानुसार सर्वसामान्यांमध्ये कमांड प्रस्थापित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. नगर लोकसभा मतदारसंघात अहमदनगर शहर, श्रीगोंदा, पारनेर, कर्जत जामखेड, पाथर्डी-शेवगाव, राहुरी असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत या सहापैकी चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि दोन जागांवर भारतीय जनता पक्षाचे आमदार निवडून आले होते.

आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली तेव्हा या लोकसभा मतदारसंघातील दोन आमदार शरद पवार यांच्या गटात गेलेत आणि दोन आमदार अजितदादा यांच्या गटात. आता मात्र पुन्हा एकदा हे समीकरण बदलले आहे कारण की अजितदादा यांच्या गटात समाविष्ट असलेले पारनेरचे आमदार निलेश लंके हे शरद पवार यांच्या गटात सहभागी झाले आहेत. त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा देखील दिला आहे. म्हणजेच आता अजितदादा यांच्या गटाची येथील पॉवर काहीशी कमी झालेली आहे. मात्र असे असले तरी भारतीय जनता पक्ष आणि अजित दादा यांचा गट यांची एकत्रितरीत्या नगर दक्षिण मध्ये पॉवर वाढलेली आहे. यामुळे ही गोष्ट सुजय विखे यांना विजयी बनवू शकते असा दावा राजकीय विश्लेषकांनी केला आहे.

याशिवाय, सुजय विखे यांच्या विजयाची शक्यता अनेक कारणांमुळे बळावत आहे. यातीलच एक कारण म्हणजे विखे घराण्याचे सहकार क्षेत्रातील योगदान. खरेतर विठ्ठलराव विखे पाटील यांच्यापासून विखे पाटील यांची पिढी राजकारणात सक्रिय आहे. विठ्ठलराव विखे पाटील यांचे सहकार क्षेत्रातील योगदान सर्वाधिक होते. त्यांनी सहकारी तत्त्वावर चालणारा आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू केला. प्रवरा हा तो साखर कारखाना. येथूनच खऱ्या अर्थाने सहकार क्षेत्राला चालना मिळाली आणि अहमदनगर हा सहकारी क्षेत्रात दमदार कामगिरी करणारा जिल्हा बनला.

यामुळे विठ्ठलराव यांची अहमदनगरचे विकास पुरुष अशी ख्याती बनली होती. ते काही काळ रयत शिक्षण संस्थेचे संचालक व उपाध्यक्ष होते. त्यांनी पुढे प्रवरा मेडिकल ट्रस्टची स्थापनाही केली. तसेच त्यांनी अत्याधुनिक सोयी सुविधा असणारे इस्पितळ देखील त्यावेळी सुरू केले. यातुन नगरमधील ग्रामीण भागातील आरोग्याचे प्रश्न सोडवण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. त्यांनी वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था आणि शैक्षणिक प्रशिक्षण संस्था सुरू केल्यात. विठ्ठलराव विखे पाटील यांच्यानंतर त्यांचे पुत्र बाळासाहेब विखे पाटील यांनी त्यांचा वारसा चालवला.

बाळासाहेब विखे पाटील यांच्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजकारणात उत्कृष्ट कामगिरी केली. अहमदनगरच्या विकासात राधाकृष्ण विखे पाटील यांची देखील कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. विठ्ठलराव विखे पाटील यांना 1961 मध्ये पद्मश्री हा पुरस्कारही मिळालेला आहे. यावरून त्यांनी केलेले कार्य किती मोठे होते याची कल्पना येते. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने तर त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी दिली आहे. सध्या सुजय विखे पाटील हे आपले पणजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांचा तोच वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम करत आहे.

विखे पाटील यांच्या चार पिढ्यांनी नगरची सेवा केली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. यामुळे मतदारसंघात असेही अनेक एकनिष्ठ मतदार आहेत जे की विखे घराण्याला पाहून मत देतात. यामुळे याचा आगामी निवडणुकीत सुजय विखे पाटील यांना चांगला फायदा होणार असून ही गोष्ट त्यांच्या पथ्यावर पडत आहे. याशिवाय गेल्या पाच वर्षात सुजय विखे पाटील यांनी खासदार म्हणून आपल्या मतदारसंघात अनेक कौतुकास्पद अशी विकासकामे केली आहेत. यामुळे हे भागभांडवल त्यांना या निवडणुकीत कामी येणार आहे. सुजय विखे पाटील यांनी नगर शहरातील बहुप्रतिक्षित उड्डाणपूल नियोजित वेळेत पूर्ण व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच नगरमधील उड्डाणपुलाचे काम नियोजित वेळेत पूर्ण होऊ शकले आहे.

नगर शहरातील पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी देखील त्यांनी विशेष प्रयत्न केलेत. भुयारी गटारीचा प्रश्न मार्गी लावणे. शहरातील वाहतूक कोंडी फुटावी यासाठी उड्डाणपूल, बायपास, रस्त्यांचे रुंदीकरण अशी अनेक रस्ते विकासाची कामे त्यांनी केली आहेत. नगर-करमाळा महामार्गाचे काम, कोरोना काळात ऑक्सिजन प्लांटची उभारणी, जिल्हा रुग्णालयाचे आधुनिकीकरण, आयुष हॉस्पिटल, वयोश्री योजना, तसेच विखे पाटील हॉस्पिटलमुळे गरजू लोकांना कमी खर्चात मिळालेले उपचार, नगर एमआयडीसीचा विस्तार, सावळी-विहीर आणि श्रीगोंदा येथे एमआयडीसीची मंजुरी अशी शेकडो कामे सुजय विखे पाटील यांनी केली आहेत.

यामुळे या विकास कामांचे भांडवल येत्या निवडणुकीत त्यांच्या कामी येण्याची शक्यता आहे. याशिवाय सुजय विखे यांच्या पथ्यावर आणखी एक गोष्ट पडू शकते ती म्हणजे विरोधकांमध्ये असणारा विस्कळीतपणा. खरेतर आता निलेश लंके यांना उमेदवारी मिळालेली आहे मात्र निलेश लंके यांचे नाव चर्चेला येण्यापूर्वी या जागेवरून गडाख अन रोहित पवार यांची देखील नावे चर्चेला आली होती. याशिवाय सुप्रिया सुळे यादेखील या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात अशा चर्चा मागे पाहायला मिळाल्यात. म्हणजेच महाविकास आघाडीकडे सुजय विखे पाटील यांच्या विरोधात उभा करण्यासाठी सक्षम उमेदवार देखील नव्हता.

हेच कारण आहे की त्यांनी अजित दादा यांच्या गटातून उमेदवार आयात केला आहे. यामुळे सुजय विखे पाटील यांच्यासाठी ही गोष्ट फायद्याची ठरणारी आहे, असा दावा त्यांचे समर्थक आणि राजकारणातील काही विश्लेषक करत आहेत. याशिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून मागे विधान परिषदेत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि काँग्रेसमध्ये बंडखोरी पाहायला मिळाली. यावरून काँग्रेसमध्ये देखील सारं काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी याचा फायदा सुजय विखे पाटील यांनाच होणार आहे. याशिवाय सर्वात मोठे कारण म्हणजे सुजय विखे पाटील हे सुशिक्षित नेतृत्व आहे.

मतदारसंघाला अशा सुशिक्षित नेतृत्वाची गरज असल्याचे मत अनेकांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. सुजय विखे पाटील हे एक न्यूरोसर्जन आहेत. ते डॉक्टर तर आहेतच शिवाय ते एक सभ्य राजकारणी म्हणून ओळखले जातात. यामुळे अशा नेतृत्वाची जिल्ह्याला गरज असल्याच्या चर्चा आहेत. परिणामी सुजय विखे पाटील यांची युवकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. विशेष म्हणजे तरुणाईसोबत सुजय विखे पाटील यांचा चांगला कनेक्ट आहे. याच कारणाने ते गेल्यावेळी देखील निवडले होते आणि यावेळी देखील यंग आणि सुशिक्षित नेतृत्व म्हणून त्यांच्या विजयाची दावेदारी त्यांच्या समर्थकांनी केली आहे.

सुजय विखे पाटील यांच्या विजयाची शक्यता बळावण्याचे आणखी एक कारण म्हणजे नरेंद्र मोदी यांची प्रतिमा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात केलेली विकासकामे आणि नरेंद्र मोदी नावाची लहर अजूनही कायम असल्याचे अनेक सर्वेमधून समोर आले आहे. यामुळे यंदाच्या निवडणुकीत देखील मोदी ब्रँड चमकु शकतो असा अंदाज आहे. असे झाले तर याचा फायदा विखे पाटील यांना देखील होणार आहे. हेच कारण आहे की यंदाच्या निवडणुकीत सुजय विखे पाटील यांचे पारडे निलेश लंके यांच्या पेक्षा जड भरेल असा दावा काही विश्लेषकांनी केला आहे आणि सुजय विखे समर्थकांच्या माध्यमातून देखील असाच दावा होत आहे. तथापि ४ जून 2024 ला जेव्हा लोकसभेचा निकाल लागेल तेव्हाच नगर दक्षिण लोकसभेचा किंग कोण हे समजू शकणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe