पालकमंत्र्यांनी केली कोविड रुग्णालयाची पाहणी

Ahmednagarlive24
Published:

चंद्रपूर दि. 26 मे: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी अत्यंत अल्प कालावधीत जिल्ह्यात सुसज्ज असे कोविड रुग्णालय स्थापन करण्यात आले असून पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या रुग्णालयाची पाहणी केली.

कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे अशा रुग्णांच्या उपचारासाठी असलेल्या सुविधेमध्ये वाढ करून  अतिदक्षता कक्ष, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदी सुविधा या उपचारासाठी आवश्यक आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने अत्यंत अल्प अशा कालावधीत सुसज्ज असे कोविड रुग्णालय उभारून रुग्णांवर उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

चंद्रपूर शहरात 68 वेंटीलेटर सह 350 बेडची व्यवस्था या रुग्णालयात असणार आहे. सामान्य रुग्णालयात उभारलेल्या या इमारतीच्या खालच्या मजल्यावर 36 व्हेंटिलेटर बेड सह ऑक्सिजनची व्यवस्था आहे.

तर पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर  4 व्हेंटिलेटर सह प्रत्येकी 42 बेडची व्यवस्था तसेच  इतरत्र वार्डच्या ठिकाणी 60 वेंटिलेटर सह 130 बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. असे एकूण 250 बेडची व्यवस्था करण्यात येत आहे.

त्यासोबतच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज चंद्रपूर येथे  8 वेंटीलेटर सह 100 ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. असे एकूण 68 व्हेंटिलेटर सह 350 बेडची व्यवस्था चंद्रपूर शहरात करण्यात येत आहे.

यावेळी  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, कार्यकारी अभियंता श्री. भास्करवार, उपअभियंता राजेश चव्हाण, सहाय्यक अभियंता विवेक अंबुले व इतर कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट

दरम्यान पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट देऊन कोरोनाच्या अनुषंगाने पाहणी केली. यावेळी योग्य त्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या.

यावेळी खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर, जिल्हाधिकारी  डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जितेश सुरवाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment