Ahmednagar News : भंडारदरा व परिसराला काल बुधवारी (दि.१७) अवकाळी पावसाने झोडपले असून अचानक आलेल्या पावसाने आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
भंडारदऱ्याच्या परिसरात काल बुधवारी प्रचंड प्रमाणात उष्णता जाणवत होती. दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन पावसाचे ढगाळ वातावरण तयार झाले. त्यानंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु झाला.
पावसाबरोबरच मोठ्या प्रमाणात गाराही पडत होत्या. भंडारदरा धरणाच्या पाणलोटात असणाऱ्या मुरशेत, पांजरे, घाटघर, रतनवाडी, कोलटेंभे परिसरातही जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडला.
अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे हवेत गारवा तयार झाला असला, तरी आदिवासी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे आंबे तसेच नुकताच तयार होत असलेल्या करवंदांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
भंडारदऱ्याच्या परिसरात काही शेतकऱ्यांच्या कांदा व गहु पिकाचेही नुकसान झाले. शेंडी येथील विट भट्टी चालक गोरख मोरे यांच्या थापुन ठेवलेल्या विटांचेही मोठे नुकसान झाले. साधारणतः अंदाजे ३ लाख रुपयांचे नुकसान अचानक आलेल्या पावसाने झाले असल्याची माहिती गोरख मोरे यांनी दिली.
हा पाऊस ४५ मिनिटे कोसळत होता. भंडारदरा धरणाच्या शाखा कार्यालयात भंडारदरा येथे ३९ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात कोणत्याची प्रकारची वाढ झाली नसून धरणाचा पाणीसाठा ३९७९ दलघफु झाला आहे. भंडारदरा धरणामध्ये ३६ टक्के पाणी शिल्लक आहे.