Ahmednagar News : अहमदनगरमध्ये ‘तुफानी’ वादळ ! घरे उडाली, जनावरे चिरले, माणसे गारांनी झोडपली, शेतीपिके जमीनदोस्त झाली…

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्रात सध्या अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील अवकाळीने कहर केला. पावसापेक्षा वादळाने तुफानी हजेरी लावली. अनेक ठिकाणी घरे उडाली,

जनावरे चिरले, पोल वाकले, माणसे गारांनी झोडपली अशी स्थिती निर्माण झाली होती. पाथर्डी, नगर, जामखेड तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले. नगर तालुक्यात व इतर ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने बुधवारी दुपारी चारच्या सुमारास हजेरी लावली.

सोनेवाडी परिसरात वादळाचा धुमाकूळ :

नगर तालुक्यातील सोनेवाडी (चास) शिवारात वादळाने अक्षरशः धुमाकूळ घातला. अनेकांची पत्र्याची घरे उडून गेली. जनावरांचे गोठे, कांद्यासाठीचे शेड, छोटी दुकाने आदी वादळाने अक्षरशः दूर उडून पडले होते. काही ठिकाणी जनावरे पत्र्याखाली दबली गेली.

एक दोन ठिकाणी पत्रे लागून गायी चिरण्याच्या घटना घडल्या. लाईटचे पोल, तारा रस्त्यावर पडले होते. मोठमोठे झाडे उन्मळून पडले होते. या सोबतच पाऊस व गारा पडल्या. त्यामुळे अनेकांची भंभेरी उडाली. अनेकांना गाराने झोडपले. फळबागा, शेती अगदी जमीनदोस्त झाली होती. लाखो रुपयांचे नुकसान गावकऱ्यांचे झाले.

पाथर्डी तालुक्यातही हजेरी

फुंदे टाकळी, कोळसांगती व पिंपळ गव्हाण या भागात जोराचा वादळी वारा झाल्याने शेतकऱ्यांच्या जनावरांच्या छपरासह विजेचे खांब, झाडे उन्मळून पडली आहेत. बुधवारी (दि.१७) दुपारी झालेल्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

थोडा हलक्या स्वरूपाचा पाऊसही यावेळी पडला, बुधवारी दुपारी अचानकपणे जोराचा वादळी वारा सुटल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली, यामध्ये शेतकऱ्यांनी जनावरांसाठी बांधलेले पत्र्याचे शेड, विजेचे खांब, झाडे या वाऱ्यामध्ये पडली. सकाळपासूनच पाथर्डी तालुक्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढून दुपारी वादळ-वारा सुटला होता. विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.

नगर तालुक्यात पाऊस व वारा

दमट हवामानामुळे मागील तीन-चार दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारी तीनच्या सुमारास मेघगर्जनेसह वादळी पाठसाने हजेरी लावली. केडगाव परिसरात अर्धा तास पाऊस झाला.

नेप्ती, निमगाव वाधा, चास, अकोळनेर, अरणगाव, वाळकी, बाबुर्डी घुमट, बड़की, खंडाळा, पारेवाडी, पारगाव, सोनेवाडी, पिंपळगाव लांडगा परिसरात वादळी वारा व पावसाने तडाखा दिला. नेप्ती, खडकी, बाबुर्डी घुमट परिसरात फळबागांचे नुकसान झाले. तसेच कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली.

जामखेड तालुकाही झोडपला

बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास अचानक आभाळ भरून आले. यानंतर विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी पावणेपाच वाजता जामखेड तालुक्यात कुसडगाव येथील शेतकरी विभीषण रामचंद्र भोरे यांची गाय शेताच्या बांधावर चरत असताना वीज पडून मृत्युमुखी पडली.

सोमवारी रात्री देखील विजेच्या कडकडाटासह आलेल्या वादळी पावसामध्ये जामखेड येथील कोठारी ऑटोमोबाइल्स या पेट्रोल पंपाजवळ वीज पडली. त्यावेळी पाऊस चालू असल्याने जवळपास दोनशे लोक निवाऱ्यासाठी पंपावर थांबले होते. मात्र, पंपावर असणाऱ्या वीज वहन यंत्रणेमुळे जीवितहानी झाली नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe