Ahmednagar News : श्रीगोंदा शहरासह तालुक्यात उन्हाच्या तडाख्यामुळे जिवाची लाही लाही होत आहे. उन्हाचा पारा ४० पार गेला असून, उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत.
सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजे दरम्यान उन्हाचा चटका इतका असतो की, नागरिक घराबाहेर किंवा कामाच्या ठिकाणाहून बाहेर पडायचे टाळत आहेत.
त्यातच तालुक्यात पाणी टंचाईच्या झळाही यंदा वाढीव तापमानाने बसू लागल्या असून, शेतातील उभी पिकेही सुकू लागली आहेत.
यंदा उन्हाळा प्रथमच तीव्र आहे. श्रीगोंदा तालुक्यात उन्हाळ्यात साधारणतः ३५ ते ३८ अंश सेल्सिअस असते. चालू वर्षी मात्र तापमान ४० ते ४१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्यामुळे शहरासह तालुक्यात लोकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे.
त्यातून कामाशिवाय लोक घराबाहेर किंवा कामाच्या ठिकाणांहून सकाळी ११ ते संध्याकाळी ५ दरम्यान बाहेर पडणे टाळतात. दुपारच्या वेळी रस्त्यांवर तसेच व्यापारी पेठामध्ये शुकशुकाट दिसून येत आहे.
वाढत्या तापमानामुळे संपूर्ण बाजारपेठ, वर्दळीच्या रस्त्यावरील वाहतूक मंदावली आहे. वाढत्या उन्हामुळे गॉगल, छत्री, टोपी, डोक्यावर पांढरे उपरणे घेतल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाहीत.
तर रसवंतिगृहे, थंडपेयाची दुकाने, ज्यूस बार येथे वर्दळ वाढली आहे. दिवसभर उष्णतेने हैराण झालेल्याना पंखा, ए.सी, कुलर यांचा आधार घ्यावा लागत असून बऱ्याच वेळा वीज गायब होत असल्याने पंखा,
ए.सी, कुलर या सोयी उपलब्ध असताना देखील उपयोग होत नसल्याने जीवाची लाही लाही होत आहे.
पाण्याच्या जारचा धंदा तेजीत….
उन्हाळ्याचे दिवस सुरू होत असतानाच तालुक्यातील पाणी पातळी घटली असून पाण्याची मागणी वाढल्याने लोकांना खासगी टँकरद्वारेही पाणी घ्यावे लागत आहे. पिण्यास टँकरचे पाणी लागते.
खासगी ५ हजार लिटर्स क्षमतेच्या टँकरला एका खेपेस गावातल्या गावात १००० ते १२०० रुपये मोजावे लागतात. तर दुसरीकडे विनापरवाना पिण्याच्या पाण्याचा जारचा गोरखधंदा तेजीत आहे.