अंगावर दगड पडल्याने मजुराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार (दि.२४) रोजी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. संदिप लहू खंडागळे (वय ३०), असे मयत मजुराचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी की, बोधेगाव येथील संदिप लहू खंडागळे, राहुल भिमा कांबळे, सुभाष उत्तम वैरागळ व प्रविण रमेश खरात हे ४ तरुण दि.२४ रोजी लखमापुरी येथील भारत भगवान गावंढे यांच्या शेतातील विहिरीवर रिंग टाकण्याचे काम करत होते.
सायंकाळी साडे चार ते पाचच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु झाल्याने पासून बचाव करण्यासाठी यातील तीन तरुण झाडाखाली गेले तर विहिरीच्या बाजुला असणाऱ्या दगड आणि डबराच्या ढिगाऱ्याच्या आडोशाला संदिप लहू खंडागळे हा बसला होता.
वारा जोरात सुटल्याने ढिगाऱ्याच्या वरील दगड मजुर संदिप लहू खंडागळे याच्या अंगावर पडल्याने त्या दगडाखाली दबला जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित मजुर सुखरूप आहेत.
बोधेगाव पोलीस दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब गर्जे हे स्वयंसेवक तरुणांना घेऊन घटनास्थळी पोहचले, तरुण आणि ग्रामस्थांच्या मदतीने संदिप खंडागळे याचा मृतदेह जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढला.
शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे, पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत संदिप खंडागळे याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शेवगावच्या ग्रामिण रुग्णालयात पाठविण्यात आला. मयत संदिप खंडागळे हा अत्यंत गरीब कुटुंबातील विवाहीत तरुण असून,
तो बोधेगांव येथील इंदिरानगर झोपडपट्टीत राहत होता. त्याला एक मुलगा आणि मुलगी आहे. त्याच्या अपघाती निधनाने बोधेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेहावर दुसऱ्या दिवशी बोधेगावात अंत्यसंस्कार करण्यात आले.