Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अगदी सिनेमात शोभावे अशी रस्तालूट करण्यात आली. यात प्रवाशांना मारहाण करत सोने, रत्नजडित अंगठ्या, रक्कम अशी ११ लाखांची रस्तालूट करण्यात आली. ही घटना घडलीये रविवारी (ता. ५) मध्यरात्री साडेतीन वाजता अहमदनगर – पुणे महामार्गावर सुपे नजीक पवारवाडी घाटात.
त्याचे झाले असे की, प्रवाशांची कार पंक्चर झाली. एका हॉटेलसमोर चाकाची पंक्चर काढण्यासाठी थांबली असता रविवारी (ता. ५) मध्यरात्री साडेतीन वाजता तीन जणांनी कारमधील तिघांना मारहाण केली. यावेळी त्यांच्या जवळील सोन्याची अंगठी, गळ्यातील लॉकेट व काही रोख रक्कम, असे सुमारे ११ लाख ६५ हजार रुपये बळजबरीने काढून घेतले, नंतर चोरट्यांनी पोबारा केला.
याबाबत श्रीधर दत्तात्रय वर्धे यांच्या फिर्यादीवरून सुपे पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात मारहाण व रस्तालुटीचा गुन्हा दाखल केला आहे. रविवारी श्रीधर वर्धे (वय ५७, रा. सदाशिव पेठ, पुणे) आपल्या कारने (एम.एच.१२, जे.यू.९५५९) पुण्यातून श्रीरामपूरकडे बैठकीसाठी गेले होते.
बैठक संपल्यानंतर जेवण करून रात्री १२ वाजता ते नगरमार्गे पुण्यात परतत होते. नगरच्या पुढे निघाल्यानंतर रात्री दोन वाजता कामरगावजवळ त्यांच्या गाडीचे चाक पंक्चर झाल्याचे चालक हनुमंत सोनवणे यांनी सांगितले.
यानंतर चाकाचे पंक्चर काढण्यासाठी दुकान शोधत असताना पवारवाडी घाटात आले असताना त्यांना पंक्चरचे दुकान दिसले, तेथे त्यांनी गाडी पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठेऊन चालकाने चाक पंक्चर काढून आणले. गाडीला चाक बसविल्यानंतर गाडीत बसताच तिघेजण दुचाकीवरून तेथे आले.
त्यांनी गाडीला घेरले. या तिघांनी आम्हाला गाडीत कोयत्याच्या दांड्याने, तसेच कोयत्याने धार नसलेल्या बाजूने मारहाण केली. यात आम्ही जखमी झालो. चोरट्यांच्या विरोधात रस्ता लूट व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी बळजबरीने वर्धे व त्यांचा मित्र श्याम चंद्रकांत ननावरे यांच्याजवळील हिर मोती बसविलेल्या त्यांच्या हातातील अंगठ्या,
सोन्याचे कडे व ३५ हजार रुपये रोख रक्कम, असा ११ लाख ६५ हजारांचा ऐवज, विविध बँकांचे क्रेडिट व डेबिट कार्ड, खिशातील पाकीट बळजबरी काढून घेऊन चोरट्यांनी दुचाकीवरून धूम ठोकली. याबाबत वर्धे यांनी सुपे पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली