Ahmednagar News : शेतात रोटा मारत होता शेतकरी, ट्रॅक्टर पलटी झाला अन त्याखाली दबून मृत्यू झाला

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : शेतात रोटा मारत असताना ट्रॅक्टर खाली दबून शेतकरी जागेवर ठार झाला आहे. ही घटना राहुरी तालुक्यातील मुळाधरणा लगत असलेल्या दरडगाव थडी येथे सोमवारी सकाळी घडली.

संजय सीताराम जाधव, वय ४३, रा. दरडगाव थडी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. अधिक माहिती अशी : संजय जाधव हे शेतात ट्रॅक्टरने रोटा मारत असताना ट्रॅक्टरचे चाक बांधावर जाऊन ट्रॅक्टर पलटी झाला.

त्यामुळे संजय जाधव हा शेतकरी ट्रॅक्टर खाली दबला गेला. या घटनेची खबर मिळताच परिसरातील शेतकरी मच्छिंद्र जाधव, बाबुराव दोंदे, बापूसाहेब रोकडे, संदीप जाधव, मधुकर जाधव यांच्यासह काही तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टर बाजूला घेत दबलेल्या संजय जाधव या शेतकऱ्याला बाहेर काढले.

उपचारासाठी राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी आंबरे यांनी संजय जाधव यांची तपासणी केली. परंतु उपचारा पूर्वीच ते मृत झाल्याची माहिती त्यांनी दिली. दुपारच्या वेळेत राहुरी येथे शवविच्छेदनानंतर संजय यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

संजय जाधव या शेतकऱ्याच्या निधनाने दरडगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संजय जाधव यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, बहिण, भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी राहुरी पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe