सोन्याचे दागिने खरेदी करायचे आहेत का? 24 कॅरेटचे खरेदी कराल की 22 कॅरेटचे? कोणते सोने सर्वात चांगले? वाचा माहिती

Ajay Patil
Published:
gold information

सोन्याची खरेदी किंवा सोन्याचे दागिने बनवणे हे भारतातील पुरुष असो किंवा महिला हा सगळ्यांचा आवडीचा विषय आहे व महिलांना तर सोन्याचे दागिने परिधान करणे अतिशय आवडते. तसेच भारतामध्ये एखादा सण आला तर अशा सणाच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर लोक सोन्याची खरेदी करतात.

दुसरे म्हणजे दागिन्यांव्यतिरिक्त गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून देखील सोन्याची खरेदी ही खूप फायद्याचे ठरते. परंतु सोन्यामध्ये 22 कॅरेट, 24 कॅरेट असे शब्द वापरले जातात. त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की यामध्ये कोणते कॅरेटचे सोने हे सर्वात शुद्ध व चांगले असते व कोणत्या सोन्याचे दागिने करायला पाहिजेत? त्यामुळे या संबंधीची माहिती आपण या लेखात बघू.

 22 आणि 24 कॅरेट सोने म्हणजे नेमके काय काय असतो त्यातील फरक?

ज्याप्रमाणे वजन मोजण्यासाठी किलोग्रॅम हे एकक आहे अगदी त्याच पद्धतीने सोन्याची शुद्धता मोजण्यासाठी देखील एककाचा वापर केला जातो व त्यालाच आपण कॅरेट असे म्हणतो. म्हणजे सरळ सरळ जर अर्थ पाहिला तर जितके जास्त कॅरेटचे सोने असेल तितके ते शुद्ध आहे असे मानले जाते.

त्यामुळे साहजिकच 24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध मानले जाते. जर आपण आकडेवारीनुसार 24 कॅरेट सोन्याची शुद्धता बघितली तर ते 99.9% असते. त्यामुळे इतर कॅरेटच्या सोन्याच्या तुलनेत या 24 कॅरेट सोन्याचे दर देखील जास्त असतात.

आपल्याला माहित आहे की सोने वेगळ्या प्रकारचे असते व यामध्ये 24 व्यतिरिक्त 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट प्रकारच्या सोन्याचा समावेश होतो. 24 कॅरेट व्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या कॅरेट असलेल्या सोन्यामध्ये तांबे, चांदी असे धातू मिसळले जातात. सोन्याच्या दागिन्यांना मजबूती येण्यासाठी हे धातू सोन्यामध्ये मिसळलेले असतात.

 गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करायचे असेल तर कोणते खरेदी करावे?

पैशांची गुंतवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून जर सोने घ्यायचे असेल तर जेवढे सोने शुद्ध असते तेवढे भविष्य काळामध्ये तुम्हाला त्यापासून चांगला परतावा मिळतो. त्यामुळे या मुद्द्याला धरून जर बघितले तर गुंतवणुकीसाठी 24 कॅरेट सोन्याची खरेदी करणे गरजेचे आहे. 24 कॅरेटऐवजी तुम्ही गुंतवणुकीसाठी 22 कॅरेट सोन्याची देखील खरेदी करू शकतात. 22 कॅरेट सोने  देखील गुंतवणुकीसाठी उत्तम आहे.

 दागिन्यांसाठी मात्र किती कॅरेटचे सोने घ्यावे?

समजा तुम्हाला सोन्याची दागिने करायचे असतील तर ते 24 कॅरेट सोन्यापासून तयार करता येत नाही. कारण 24 कॅरेट सोने हे फार नरम असते व ते लगेच तुटते. याकरिता तुम्ही 24 कॅरेट ऐवजी सोन्याची दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट किंवा त्यापेक्षा कमी कॅरेट असलेल्या सोन्याचा वापर करून दागिने बनवणे फायद्याचे ठरते. कारण 24 कॅरेट ऐवजी इतर कॅरेट असलेल्या सोन्यामध्ये तांबे व चांदी असे धातू मिसळलेले असतात व यामुळे दागिन्यांना मजबूती येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe