अहमदनगर जिल्हा हादरला ! पुरुष मुंडके, धडाचा कुजलेला मांसाचा तुकडा, करदोरा आणि गुडघ्याच मांस…

Published on -

Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील देडगाव येथे अनोळखी पुरुषाचा खून करून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून मुळा कालव्याच्या पाथर्डी बँच पाटात टाकल्याची घटना गुरुवारी घडल्याने देडगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबद देडगावचे पोलीस पाटील प्रल्हाद यशवंत ससाणे (वय ४७) यांनी नेवासा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली की, दि. १६ मे २०२४ रोजी देडगावचे सरपंच चंद्रकांत भानुदास मुंगसे (वय ४९) यांनी दूरध्वनीवरून कळविले की, देडगावच्या हद्दीतील पाथर्डीकडे जाणाऱ्या मुळा धरणाच्या पाटात एका माणसाच्या पायाचा मांसाचा तुकडा पाण्यावर तरंगत आहे.

या माहितीवरून दुपारी ३ वाजता घटनास्थळ गाठले. यावेळी पाटामध्ये एक मानवी पायाचा मांसाचा तुकडा पाण्यावर तरंगत असल्याचे दिसले. त्यामुळे मी तत्काळ कुकाणा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस नाईक किरण पवार यांना कळविले. त्यानंतर काही वेळाने नेवासा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व पोलीस नाईक किरण पवार घटनास्थळी आले.

दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास दोन पंचांसमवेत पाटामध्ये पाहाणी केली. या ठिकाणी एक मानवी पायाचा सडलेला तुकडा पाण्यावर तरंगत असल्याचे दिसले. त्यानंतर पाटाच्या पूर्व दिशेला पाहाणी केली शरीराचा पार्श्वभाग व मांडी असलेला कुजलेला मासांचा तुकडा मिळून आला.

पुढे काही अंतरावर एका पिवळ्या रंगाच्या गोणीमध्ये अनोळखी मानवी कुजलेले पुरुष जातीचे मुंडके, धडाचा कुजलेला मांसाचा तुकडा, त्यास करदोरा व गुडघ्याचा कुजलेला मांसाचा तुकडा मिळून आला.

त्यांनतर अजून पुढे जाऊन पाहिले असता, एक हाताचा कोपऱ्यापासून तुटलेला तुकडा मिळून आला. याबाबत पोलिसांनी दोन पंचांसमक्ष पंचनामा केला. सर्व तुकडे पोलिसांनी ताब्यात घेतले व शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. कुणीतरी या अज्ञात व्यक्तीचा खून करून त्याच्या शरीराचे तुकडे विल्हेवाट लावण्यासाठी व पुरावा नष्ट करण्यासाठी पाटात टाकल्याचे प्रथमदर्शनी दिसते.

यामुळे अज्ञात आरोपीविरोधात नेवासा पोलीस ठाण्यात भा. दं.वि. कलम ३०२, २०१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील व श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी घटनास्थळी भेट दिली. शवविच्छेदनानंतर मृतदेहाचे दफन करण्यात आले. मृतक शरीर अंदाजे २५ ते ३० वर्षे वयाचे पुरुष जातीचे आहे, असे पोलीस प्रशानकडून सांगण्यात आले.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News