Kajwa Festival 2024 : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील काजवा महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. काजव्यांचा पर्यटकांना मनमुराद आनंद घेता यावा, यासाठी वन्यजीव विभागाने काही बंधने घातली असून रात्री ९ नंतर कोणत्याही परिस्थितीत अभयारण्यात प्रवेश दिला जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात दरवर्षी २५ मे १५ जुनच्या दरम्यान काजव्यांची चमचम बघावयास मिळत असते. काजव्यांचा हा करिष्मा बघण्यासाठी दरवर्षी पर्यटक मोठ्या अभयारण्यात येत असतात. याही वर्षी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता त्या गर्दीवर नियत्रंण मिळविण्यासाठी वन्यजीव विभागाकडून काही बंधने घालण्यात आली आहेत.
![Kajwa Festival 2024](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2024/05/Ahmednagar-News-2024-05-18T101425.695.jpg)
काजवा महोत्सवासंदर्भात शेंडी येथे वन्यजीव विभागाच्या विश्रामगृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी राजुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक सरोदे, वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे, वनपाल शंकर लांडे, भास्कर मुठे, परिसरातील टेंट धारक व वन्यजीव विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
आढावा बैठकीत काजवा वाचविण्याचे आवाहन करण्यात आले असुन काजवा वाचला तरच काजवा महोत्सव सुरू राहील, असे वन्यजीव विभागाकडून सांगण्यात आले. काजवा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना रात्री ९ वाजेच्या आतच परवाणगी देण्यात आली आहे. काजवा हा अभयारण्यात असुन प्रवेश शुल्क आकारुनच अभयारण्यात प्रवेश मिळेल. अभयारण्यात ठिकठिकाणी वाहनतळ बनविण्यात आले आहे.
या वाहनतळावरच वाहने पार्कीग करणे बंधनकारक राहील. अभयारण्यात कोणत्याही प्रकारचा मद्यसाठा नेऊ दिला जाणार नाही, अभयारण्यातील टोलनाक्यावर पोलिस विभागाकडून वाहनांची तपासनी करण्यात येईल. अभयारण्यात काजवा बघण्यासाठी गेलेल्या पर्यटकांनी दुरुनच आनंद घ्यावा. काजव्यांच्या झाडांना हलवु नये. काजवा स्थळ सोडुन पर्यटकांनी जंगलात एकटे फिरु नये, काजवा बघुन झाल्यानंतर रात्री १० वाजेच्या आत अभयारण्यातुन बाहेर पडावे.
अभयारण्यात टेंट साईटवर बुकींग केलेल्या पर्यटकांची नोंदवहीत नोंद करणे बंधनकारक राहील. रात्री १० नंतर अभयारण्यात कोणतेही वाद्य वाजविण्यास परवानगी देण्यात येणार नाही. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कायद्याचा बडगा उगारला जाणार असल्याचे सुतोवाच वन्यजीव विभागाकडुन देण्यात आले आहेत. राजुर पोलिसांच्या वतीने सर्व पर्यटकांनी काजव्यांचा शांततेत एनंद लुटण्याचे आवाहन करण्यात आले आहे.