Ahmednagar News : मुळा डावा कालव्यानजिकच्या शेतकऱ्यांची पिके पाण्यावाचून जळून चालल्याने आम्हाला आमच्या हक्काचे राखीव असलेले पाणी तातडीने उपलब्ध करून द्यावे, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी मोरे यांनी दिला.
सुटलेले पाणी शेतीच्या सिंचनासाठी नसून ते पिण्यासाठी मुसळवाडी तलाव, ओढे, नाले याला सोडण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पाटबंधारे खात्याने शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याने शेतकऱ्यांनी अर्धनग्न होत रास्तारोको आंदोलन केले
तहसीलदार कार्यालयात गुरुवारी शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी तहसीलदारांसमोर पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याबाबत सायंकाळपर्यंत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले होते;
पण रात्री उशिरापर्यंत कोणताही निर्णय न आल्याने काल शुक्रवारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी भर उन्हात रस्त्यावर उतरले व नगर- मनमाड महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. यावेळी शेतकरी अर्धनग्न होऊन रस्त्यावर बसले होते.
यावेळी मोरे म्हणाले, मुळा धरणामध्ये ७ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यातील साडेचार टीएमसी पाणी राखीव असून उर्वरित पाणी भविष्यासाठी ठेवल्याचे पाटबंधारे खात्याचे अधिकारी सांगतात. मग जे अडीच टीएमसी पाणी राखीव आहे, त्यातील आम्हाला फक्त ३०० एमसीएफटी पाणी द्या. ते आमच्या हक्काचे पाणी आहे. उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे.
डाव्या कालव्याअंतर्गत येणाऱ्या बारागाव नांदूर, मोमीन आखाडा, काळे आखाडा, जोगेश्वरी आखाडा, राहुरी, वाघाचा आखाडा, आरडगाव, मानोरी, मांजरीपर्यंत अनेक गावात पाण्याची टंचाई अधिक तीव्र होत चालली आहे. हाताशी आलेली उभी चारा पिके जळून चालली आहेत.
जनावरांना चारा, प्यायला पाणी उपलब्ध नाही. अशा टंचाईच्या काळात शासन धरणातील पाणी शेतीला देणार नसेल, तर त्या जादा ठेवलेल्या अडीच टीएमसी राखीव साठ्याचा काय उपयोग? असा सवाल मोरे यांनी केला.
अर्ध्या तासानंतर शेतकऱ्यांच्या वतीने नायब तहसीलदार संध्या दळवी, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पाटबंधारे खात्याचे उपअभियंता प्रकाश पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी दिलीप इंगळे, प्रकाश भुजाडी, बबन आघाव, विजय तमनर आदी प्रमुख शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बाळासाहेब खुळे, प्रकाश देठे, रामदास वने, आनंद वने, सुनील इंगळे, सचिन वराळे, जालिंदर गाडे, सूर्यभान गाडे, भाऊसाहेब कोहकडे, अक्षय वने, सुधीर वने, संजय पोटे, जितेंद्र इंगळे, राहुल काळे, सुनील आढाव, संतोष आघाव, महेश उदावंत यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. अर्ध्या तासाच्या आंदोलनानंतर सुमारे दोन तास दोन्ही बाजुंनी वाहतूक ठप्प होती. ती सुरळीत करता करता पोलिसांच्या नाकी नऊ आले. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.