Ahmednagar News : शेतीला खाते आवश्यक असतातच. सध्या शेतकरी भरमसाठ रासायनिक खताचा वापर करतात. परंतु आता याचे तोटे समोर आल्याने शेतकरी पुन्हा शेणखताकडे वळल्याचे दिसते. त्यामुळे शेणखताची मागणी वाढली आहे.
मागील दोन ते तीन वर्षांपूर्वी तीन हजार रुपयांपर्यंत असणारी शेणखत ट्रॉली आज सहा हजारांवर गेली. त्यामुळे शेणखताला सोन्याचा भाव आला आहे. शेणखतामुळे जमिनीचे आरोग्य उत्तम राहून जमिनीचा पोत सुधारून उत्पादनही भरघोस मिळते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेणखताला मागणी वाढू लागली आहे.
काही दिवसांवरच खरीप हंगाम आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग खरीप हंगाम पूर्व मशागतीसाठी सुरू आहे. वर्षभरात उन्हाळ्यामध्येच शेतकऱ्यांना शेतामध्ये शेणखत टाकता येते. त्यामुळे सध्या शेतकरी शेणखत टाकण्याच्या कामाला प्राधान्य देत आहेत. मिळेल तिथून अधिकाधिक शेणखत विकत घेऊन टाकत आहेत.
सध्या शेणखताच्या एका ट्रॉलीला सहा हजार रुपये मोजावे लागत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अधून-मधून अवकाळी पाऊस बरसत असल्याने शेतकऱ्यांची शेतात खत टाकण्यासाठी धांदल उडत आहे.
चांगल्या दर्जेदार शेणखतासाठी हे करा
चांगले कुजलेले शेणखत तयार होण्यासाठी मुक्तसंचार गोठा चांगला पर्याय आहे, तसेच शेणखत कुजण्यासाठी खड्ड्यांमध्ये दोन ते तीन वेळेस पाणी सोडावे. शेणखत अपुरे पडत असेल, तर हिरवळीचे खत म्हणून धैंचा, ताग, चवळी आदी पिके जमिनीत गाडावी.
शेतातील पिकाचा कोणताही अवशेष जाळू नये. त्याचा गांडूळ खत, नाडेप, कंपोस्ट खत म्हणून वापर करावा. सेंद्रिय पदार्थाचे विघटन व पिकास उपलब्धता करून देणाऱ्या सूक्ष्म जिवाणूंची संख्या जमिनीत वाढविली पाहिजे.
शेणखत वापराचे फायदे
शेणखत हा सेंद्रिय कर्ब व जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. मातीतील जैविक घटकांच्या वाढीसाठी व सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता वाढविण्यासाठी चांगले कुजलेले शेणखत फायदेशीर ठरते.
जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढला तरच जमिनीतील अथवा बाहेरून दिलेली अन्नद्रव्ये पिकांसाठी उपलब्ध होतात. सेंद्रिय खतामुळे जमिनीचा पोत सुधारतो, माती भुसभुशीत राहून हवा-पाणी यांचे परिवहन होऊन मातीचा जिवंतपणा टिकविला जातो.