Ahmednagar News : व्हॉटस्अपवर ठाकरे परिवाराची बदनामी, शिवसैनिक आक्रमक झाल्याने थोडासा तणाव, अहमदनगरमधील घटना

Ajay Patil
Published:

Ahmednagar News : सोशल मीडिया जितकी प्रभावी तितकी घातक देखील ठरू शकते. त्यात आता AI सारखी टेक्नॉलॉजी आल्याने डीपफेक सारखी अनेक प्रकरणे देखील घडली.

व्हॉटस्अॅप हे माध्यम देखील अनेक कुरापतींचे कारक ठरत असल्याचे चित्र आहे. अहमदनगरमध्ये देखील असेच एक प्रकरण समोर आले आहे. व्हॉटस्अॅप ग्रुपमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे परिवाराच्या संदर्भात त्यांची बदनामी होईल, असा मजकूर टाकण्यात आलाय.

ही घटना संगमनेर येथील एका व्हॉटस्अॅप ग्रुपमध्ये घडली. त्यामुळे उद्धवसेनेचे सैनिक आक्रमक झाले आहेत. या मजकुरामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उद्धवसेनेच्या सैनिकांनी केली आहे.

त्या संदर्भाने मंगळवारी (दि. २८) संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना निवेदन देण्यात आले. उद्धवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी सांगितले की, संगमनेरातील एका व्हॉटस्अॅप समूहात संबंधित समूहाचे अॅडमिन यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ठाकरे परिवारावर अतिशय खालच्या पातळीवर टीका केली.

तसेच शिवसैनिकांना आदित्य ठाकरे यांना हिणविले. यापूर्वीही याच समूहात माजी मुख्यमंत्री ठाकरे यांची बदनामी होईला व त्यांचा फोटो चुकीच्या पद्धतीने एडिट करून जाणीवपूर्वक फोटो शेअर व फॉरवर्ड केले होते.

त्यावेळीसुद्धा आम्ही शिवसेना पक्ष व महाविकास आघाडीच्या वतीने संगमनेर शहर पोलिस स्टेशनला तक्रार अर्ज दिला होता, परंतु संबंधित समूहाचे अॅडमिन हे पुनःपुन्हा चूक करत आहे, यापूर्वी त्यांना दोन वेळा आपल्या स्तरावरून नोटिसा देऊनसुद्धा त्यांनी स्वतःच्या अकाउंटवरून मोबाइल नंबरवरून चुकीच्या पद्धतीची पोस्ट शेअर केल्याने आमच्या भावना दुखावल्या आहेत.

त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी आमची मागणी आहे. माजी शहरप्रमुख कतारी, युवा सेनेचे राजू सातपुते, उपशहर प्रमुख वेणुगोपाल लाहोटी, दीपक साळुंखे आदी यावेळी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe