अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :-विधानसभा निवडणुकीच्या वेळी झालेले राजकीय नाट्य सर्वांनीच अनुभवले आहे. अजित पवारांचे बंड हे आघाडी सरकारला चांगलेच महागात पडले होते.
परंतु आता पुन्हा एकदा अजित पवार अस्वस्थ झालेले दिसत आहेत. मागील दोन महिन्यांपासून अजित पवार हे कमालीचे शांत आहेत. ते माध्यमांशीही बोलले नाहीत.
त्याचं मुख्य कारण हे अजित पवारांची अस्वस्थता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवार नाराज असणं ही ठाकरे सरकारसाठी धोक्याची घंटा आहे असंही आता म्हटलं जात आहे.
महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करताना भाजपच्या तंबूत गेलेल्या अजित पवारांचं मन वळवून त्यांना पुन्हा परत आणण्यात आलं होतं.
त्यावेळी त्यांचं महत्त्व पूर्वीसारखच राहिल याचं आश्वासन त्यांना शरद पवारांकडून देण्यात आलं होतं. नंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यातही आलं. मात्र आता त्यांची पक्षावरची पकड पूर्वीसारखी राहिली नाही असं म्हटलं जात आहे.
आता सर्व सूत्र ही शरद पवारांनी आपल्या ताब्यात ठेवली असून कोरोनाच्या गंभीर काळात गेल्या दोन महिन्यात अजित पवार आणि शरद पवार यांच्यात भेट झाल्याचं पुढे आलेलं नाही.
आपल्याला पद्धतशीरपणे डावललं जातंय असं अजित पवारांना वाटतं अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीपासूनच अजित पवार हे नाराज असल्याचं बोललं जातंय.
सुप्रिया सुळेंची वाढत चाललेली सक्रियता, रोहित पवारांना शरद पवारांनी दिलेलं बळ. पार्थ पवारांचा लोकसभा निवडणुकीतला पराभव, त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरचं फसलेलं बंड यामुळे अजित पवारांची नाराजी वाढलेली आहे.
संकटाच्या काळात शांत राहाण अजित पवारांच्या शैलीत बसणारं नाही. त्यांचा कामाचा उरक, आवाका हा जास्त आहे, निर्णयक्षमता जबरदस्त आहे असं म्हटलं जात असतानाही ते मागे राहताहेत की त्यांना जाणीवपूर्वक मागे ठेवलं जातय याची चर्चा आता राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews