अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : राज्यातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थेच्या कोपरगाव येथील एका नामांकित संस्थेच्या शाळेतील क्लर्कला करोनाची बाधा झाली आहे. त्याच्या संपर्कातील सात जणांना आरोग्य यंत्रणेने ताब्यात घेऊन त्यांच्या घशातील स्राव तपासणीसाठी घेतले आहेत.
लोणी-पिंपरी निर्मळ रस्त्यालगतच्या विद्यानगरभागात राहणार्या क्लर्कला त्रास होऊ लागल्याने त्याने गावातील खाजगी डॉक्टरकडे उपचार घेतले. मात्र त्रास कमी होत नसल्याने लोणी येथील प्रवरा रुग्णालयाच्या कोविड 19 सेंटरमध्ये नेऊन स्रावाची तपासणी केली असता ती पॉझिटिव्ह आली.
त्यानंतर नगर येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. तेथेही पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाची झोप उडाली आहे . राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रमोद म्हस्के,
ग्रामीण रुग्णालय लोणीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीपाद मैड, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील आणि शासकीय यंत्रणा बाधित शिक्षकाच्या कुटुंबातील आणि संपर्कातील नऊ व्यक्तींना ताब्यात घेऊन लोणीच्या कोविड १९ सेंटरमध्ये नेऊन त्यांच्या घशातील स्राव घेण्यात आले.
याशिवाय बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आणखी १९ व्यक्तींना शिर्डी येथील साईआश्रममध्ये क्वारंटाइन केले. गावातील विद्यानगर, सप्तशृंगीनगर, गणेश कॉलनी, प्रिन्स कॉर्नर, साईनगर, साई कॉलनी, समर्थ कॉलनी, दत्त नगर, पार्वती कॉलनी हा भाग प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित केले आहे .
पुढील १४ दिवस हा परिसर सील राहणार आहे. या परिसरातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जात आहे. लोणी बुद्रुक व खुर्द ही दोन्ही गावे एकमेकांना जोडलेली असल्याने लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने ७ जूनपर्यंत गाव लॉकडाऊन केले असून, दवाखाने, मेडिकल दुपारी 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली असून इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews