अहमदनगर Live24 ,18 जून 2020 : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे कामकाज सुरु आहे. परंतु या दरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या कामासाठी परिसरातील शेतकऱ्याच्या शेतातून माती व मुरुमाची चोरी केल्याची घटना घडली असून त्यासंदर्भात कंत्राटदार कंपनी गायत्री कन्स्ट्रक्शन्स विरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी : दीपक मुनोत यांची देर्डे चांदवड येथे शेतजमीन आहे. ते नोकरीनिमित्त पुण्यात राहतात. मुनोत यांच्या मालकीची एकत्रित ३ एकर १५ गुंठे जमीन आहे. या परिसरात समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे.
गायत्री कन्स्ट्रक्शन्स कंपनीचे चेअरमन, कार्यकारी संचालक, व्यवस्थापकीय संचालक, प्रकल्प प्रमुख ताता राव, पितांबर जेना यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी, जेसीबी चालक यांनी संगनमताने शेतामध्ये बेकायदा प्रवेश करून सुमारे ४० फूट खोल खोदकाम करून माती तसेच मुरूम चोरून नेली.
शेतातील विहीर बुजविण्यात आली. पिकांची नासधूस झाली असून यापुढे शेती पिके घेण्यास उपयुक्त राहिली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या संदर्भात सुरुवातीला पाठपुरावा केला असता कर्मचाऱ्यांनी चूक मान्य करून नुकसान भरपाई देण्याची तयारी दर्शविली होती.
नंतर मात्र, कंपनीने उडवाउडवीची उत्तरे दिली. नुकसान भरपाईबाबतही शब्द देऊन सातत्याने टाळाटाळ केली. त्यामुळे मुनोत यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews