कोरोना रुग्‍णांची वाढती संख्‍या पाहाता राज्‍य सरकारचे अपयश उघड

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :   कोरोना संकटाच्‍या पार्श्‍वभूमिवर आत्‍मनिर्भर भारत अभियानातून देशाला पुन्‍हा समृध्‍दतेने पुढे नेण्‍याचा संकल्‍प पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केला आहे. दुसरीकडे मात्र राज्‍यातील आघाडी सरकारने कोणतीही मदत जाहीर न करता राज्‍यातील जनतेला वा-यावर सोडुन दिले आहे, निर्णय प्रक्रीयेत स्‍थान नसलेला कॉंग्रेस पक्षही आपली जबाबदारी आता झटकत असल्‍याची टिका विधीमंडळ भारतीय जनता पक्षाच्‍या प्रतोद आ.सौ.देवयानी फरांदे यांनी केली.

शिर्डी विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या व्‍हर्च्‍युअल सभेत आ.सौ.फरांदे यांनी मार्गदर्शन केले. मतदार संघातील विविध गावांमधुन भारतीय जनता पक्षाच्‍या पदाधिकारी कार्यकर्त्‍यांसह माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील, माजीमंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील,भाजपाचे उत्‍तर नगर जिल्हाध्‍यक्ष राजेंद्र गोंदकर, पुणे विद्यापीठेचे सिनेट सदस्य अनिल विखे, सरचिटणीस नितीन कापसे, तालुका अध्‍यक्ष नंदकुमार जेजूरकर ट्रक्‍स वाहतुक सोसायटीचे चेअरमन नंदु राठी, बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, शांतीनाथ आहेर, संचालक संजय आहेर, विजय लगड,व्‍हर्च्‍युअल सभेचे उत्‍तर नगर जिल्‍ह्याचे समन्‍वयक योगीराजसिंग परदेशी, सचिन भांगे आदींनी सहभाग घेतला.

आ.सौ.देवयानी फरांदे यांनी केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली कोरोनासारख्‍या वैष्‍वीक महामारीला तोंड देतानाच देशाला पुन्‍हा आत्‍मनिर्भरतेने उभे करण्‍याचा संकल्‍प केला. यासाठी गरीब कल्‍याण योजनेबरोबर आत्‍मनिर्भर भारत योजनेतून २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. या माध्‍यमातून राज्‍यातील समाज घटकांना मोठ्या प्रमाणात दिलसा मिळाला. जनधन खात्‍यांमध्‍ये २१५८ कोटी रुपये वर्ग करण्‍यात आले.

७३ लाख लोकांना उज्‍वला गॅस योजनेतून सिलेंडर वाटप करण्‍यात आले. ४ हजार ५९२ कोटी रुपयांच्‍या माध्‍यमातून धान्‍य वितरीत करण्‍यात आल्‍याचे स्‍पष्‍ट करुन राज्‍य सरकारने मात्र जाणीवपुर्वक धान्‍यापासुन जनतेला वंचित ठेवण्‍याचे काम केले. विरोधी पक्षनेते ना.देवेंद्र फडणवीस यांनी आवाज उठविल्‍यानंतर केशरी रेशनकार्ड धारकांना राज्‍य सरकारला धान्‍य द्यावे लागले. किसान क्रेडीट योजना, सुक्ष्‍म लघु उद्योजकांबरोबरच हातगाडी आणि छोटे व्‍यवसायीक यांना पुन्‍हा प्रवाहात आणण्‍याचे काम केंद्रातील सरकार करत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

एकीकडे केंद्र सरकार या संकटातून देशाला आणि जनतेला वा‍चविण्‍यासाठी सर्वोतोपरी प्रयत्‍न करीत असताना राज्‍य सरकार मात्र जनतेला दिलासा देण्‍यात पुर्णपणे अपयशी ठरल्‍याचा आरोप करुन आ.सौ.फरांदे म्‍हणाल्‍या की, तीन पक्षांचे सरकार केवळ जनतेची अडवणूक करत आहे. सरकारच्‍या निर्णय प्रक्रीयेत एकवाक्‍यता नाही, सुसंवाद नाही, लॉकडाऊन उठल्‍यानंतरही कोरोना रुग्‍णांची वाढती संख्‍या पाहाता राज्‍य सरकारचे अपयश उघड झाले असुन, या सरकारची कर्जमाफीची घोषणाही खोटी ठरली आहे.

कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपुर्वी केलेले वक्‍तव्‍य लक्षात घेता सत्‍तेत सहभागी असलेला कॉंग्रेस पक्षही आपली जबाबदारी झटकत असल्‍याचा आरोप त्‍यांनी केला. माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी पहिल्‍याच वर्षात राम मंदिर, नागरीकत्‍व सुधारणा विधेयक, ३७० वे कलम रद्द करण्‍याचा ऐतिहासीक निर्णय घेतला.

कोरोना संकटाच्‍या काळातही जनतेला दिलासा देताना जगाच्‍या पाठीवर देशाची प्रतिमा उंचावण्‍याचेच महत्‍वपुर्ण काम केले. देशहित आणि लोकहितासाठीच मोदी सरकारचे पहिले वर्ष यशस्‍वी झाले असल्‍याचे स्‍पष्‍ट करुन आत्‍मनिर्भर भारत योजनेबाबत जनतेत जावून कार्यकर्त्‍यांनी संदेश द्यावा असे आवाहन त्‍यांनी केले. व्‍हर्च्‍युअल सभेचे सुत्रसंचलन योगिराजसिंग परदेशी यांनी केले. राहाता तालुका अध्‍यक्ष नंदकुमार जेजूरकर यांनी आभार मानले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment