अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 : तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी तनपुरे साखर कारखान्याचे वाटोळे करून स्वत:च्या मालकीचा साखर कारखाना काढला. त्यांना कुणीही जाब विचारला नाही. मात्र, बंद पडलेला तनपुरे साखर कारखाना ज्यांनी सुरू केला,
त्यांच्यात भांडणे लावण्याचे काम काही विघ्नसंतोषी लोकांकडून सुरू आहे, असे स्पष्ट करत साखर कारखान्याला आजवर मदत करत आलेल्या माजी आमदार शिवाजी कर्डिले व माझ्यात कुठलेही वाद नसल्याचा खुलासा खासदार डाॅ. सुजय विखे यांनी केला.
मागील पंधरवाड्यात जिल्हा बँकेच्या बैठकीत डाॅ. तनपुरे साखर कारखाना विषय चर्चेला आला नसल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू होते. साखर कारखाना विषयासंदर्भात अध्यक्ष उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने
माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची भेट घेतली असता शेतकरी, कामगार व तालुक्याच्या बाजारपेठा सुरळीत राहण्यासाठी डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू होण्यासाठी सकारात्मक निर्णय होईल, यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
खासदार डाॅ. सुजय विखे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले, तनपुरे सहकारी साखर कारखाना थकबाकी संदर्भात अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेकडून नोटीस मिळाली असून ही नोटीस ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमाप्रमाणे अपेक्षित आहे.
मात्र, या कारवाईला विखे-कर्डिले वादाचे स्वरूप काही लोकांनी दिल्यामुळे सहकारात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनोबलावर विपरित परिणाम होत आहे.
कारखाना चालू करण्यास महत्त्वाची भूमिका बजावणारे माजी आमदार शिवाजी कर्डिले व विद्यमान संचालक मंडळाच्या प्रामाणिक प्रयत्नांची आणि सहकारात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची खिल्ली उडवल्यासारखा हा प्रकार आहे.
कारखाना विषय जिल्हा बँकेकडे असून माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची पुन्हा मदत होणार आहे. जिल्हा बँकेच्या कारवाईला विखे-कर्डिले वादाचे स्वरूप नसल्याचे विखे यांनी स्पष्ट केले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews