मुख्यमंत्र्यांचे विठ्ठला चरणी साकडे : विठ्ठला महाराष्ट्र आणि अवघा देश कोरोनामुक्त होऊ दे !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 :  दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारा आषाढी एकादशीचा सोहळा यंदा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडलाय.

आज पहाटे विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक केली. यंदा मानाचे वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील विठ्ठल बडे यांना पूजेचा मान मिळाला होता.

महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी आज घातले.

श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पहाटे दोन वाजता सुरू झाली. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा मानाचे वारकरी अहमदनगर जिल्ह्यातील

वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि सौ. अनुसया बढे (मु.चिंचपूर-पांगुळ, ता. पाथर्डी) या दाम्पत्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी केली.

श्री विठ्ठलाची परंपरेप्रमाणे भक्तीभावाने पूजा करण्यात आली. विठ्ठलाला मोरपंखी रंगाचे मलमली वस्त्र परिधान करण्यात आले. फुलांचा आणि तुळशीचा हार घालण्यात आला तेव्हा सावळ्या विठुरायाचे रूप अधिकच खुलून दिसू लागले.

विठ्ठलाची आरती करण्यात आली. तेव्हा उपस्थित सर्वांनी पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असा जयघोष केला. त्यानंतर श्री रुक्मिणी मातेची देखील परंपरेप्रमाणे पूजा करण्यात आली.

कोरोनामुळे जग, देश तसेच महाराष्ट्रावर मोठे संकट आले आहे. कोरोनाचे हे संकट लवकरात-लवकर दूर करून महाराष्ट्र आणि अवघा देश कोरोनामुक्त होऊ दे.

राज्यातील शेतकरी, वारकरी आणि अवघ्या विठ्ठल भक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी आषाढी एकादशीला माऊलींच्या दर्शनाला आलो.

बळीराजाला सुखी करण्याचे आणि राज्यातील सर्व नागरिकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपणास बळ द्यावे, अशी मागणी श्री विठ्ठलाकडे केल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

श्री. ठाकरे म्हणाले, विठू माऊली समोर कोणी मुख्यमंत्री नाही, मंत्री नाही अथवा अधिकारी देखील नाही. माऊली पुढे सर्वजण सारखेच. आषाढी एकादशीच्या पूजेचा मान कधी मिळेल

असा विचार स्वप्नातही केला नव्हता. आज हा मान जरूर मिळाला परंतु अशा परिस्थितीत, मास्क बांधून पूजा करावी लागेल, असेही कधी वाटले नव्हते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मिलिंद नार्वेकर यावेळी उपस्थित होते.

यंदा मानाचा वारकरी म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या पाथर्डी येथील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे यांना मान मिळाला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe