अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :उत्तर प्रदेशमधील आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या गँगस्टर विकास दुबे याला पोलिसांनी मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये अटक केली आहे, दरम्यान, विकास दुबेच्या एकूण तीन सहकाऱ्यांना पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केले आहे.
विकास दुबेला अटक होताच उत्तर प्रदेश पोलिसांची एसटीएफ टीम उज्जैनला रवाना झाली आहे. विकास बुधवारी फरिदाबादमध्ये दिसला होता. तिथून तो उज्जैनला कसा पोहोचला, याबद्दलची चौकशी सुरू आहे.
विकासच्या अटकेसाठी पोलीस सक्रिय असताना, त्याला राज्याबाहेर जाण्यास कोणी मदत केली याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. विकास दुबेला मध्य प्रदेशातल्या महाकाल मंदिरातून ताब्यात घेण्यात आलं.
मंदिराच्या सुरक्षा रक्षकांनी विकासला पकडल्याचं वृत्त एका न्यूज चॅनेलने दिलं आहे. विकासला पाहताच सुरक्षा रक्षक सतर्क झाले होते. त्यांनी विकासला पकडून याची माहिती तातडीनं पोलिसांना दिली.
कुख्यात गुन्हेगार विकास दुबेला पकडण्यासाठी गेलेल्या कानपूर पोलिसांवर दुबेच्या टोळीने अंधाधुंद गोळीबार केला होता. या घटनेत ८ पोलिस शहीद झाले.
या घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेश हादरला होता. पोलिसांवर झालेला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला होता. हिस्ट्री सीटर विकास दुबेवर अनेक गुन्हे दाखल आहेत. संपूर्ण उत्तर प्रदेशाला विकास दुबेने हादरवून सोडले होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews