अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- संगमनेर तालुक्यात भावाने केलेल्या शिवीगाळीमुळे पत्नी घर सोडून माहेरी गेल्याचा राग मनात धरून अंध असलेल्या छोट्या भावाने आपल्या सख्ख्या मोठ्या भावाचा सुरीने वार करून निर्घृण खून केला
ही घटना बुधवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास शहरातील माताडे मळा परिसरात घडली. किशोर मनोहर अभंग (वय 32, रा. माताडे मळा, सुकेवाडी रोड, संगमनेर) असे मयताचे नाव आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी कि, मनोहर काशिनाथ अभंग (वय 68) हे सेंट्रींग काम करून उदरनिर्वाह करत होते. ते आपल्या तीन मुलांसह सुकेवाडी रस्त्यावरील माताडे मळा येथे राहतात.
त्यांचा मोठा मुलगा किशोर अभंग (वय 32) रंगकाम करतो, दुसरा मुलगा साहेबराव अभंग हा सेंट्रींग काम करत होता. त्याची पत्नी दोन मुलांसह माहेरी बाभळेश्वर येथे राहते.
दरम्यान बुधवारी सायंकाळी साहेबराव अभंग आणि किशोर अभंग या दोन भावांमध्ये भांडण झाले. ‘तू शिवीगाळ केल्यामुळे माझी पत्नी मला सोडून गेली’ असे सांगत साहेबराव याने किशोरला शिवीगाळ केली.
रात्री 10 वाजेच्या सुमारास साहेबराव याने किशोरच्या पोटावर सुरीने वार केले. 10.30 वाजेच्या सुमारास साहेबराव हा वडील झोपलेल्या रुमच्या दरवाजासमोर येऊन दरवाजा वाजू लागला
आणि ‘एकाला संपविले आता तुमचा नंबर’ असे म्हणत आरडाओरड करू लागला. त्यामुळे वडील घाबरले. त्यांनी दरवाजा उघडला नाही.
मात्र शेजारी राहणार्यांनी त्यांच्या गच्चीवरून ओरडत मनोहर अभंग यांना सांगितले की, तुमचा किशोर जखमी अवस्थेत अंगणात पडलेला आहे. हे ऐकताच मनोहर अभंग यांनी दरवाजा उघडला.
अंध मुलगा साहेबराव याच्या हातात सुरी दिसली तर जखमी किशोरच्या पोटातून रक्त निघत होते. मनोहर अभंग यांच्या नातवाने त्याच्या मित्रांना बोलावून जखमी किशोर अभंग यास मोटारसायकलहून हॉस्पिटलमध्ये नेले.
घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकार्यांनी किशोर याची तपासणी केली असता तो मयत झाल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत मनोहर काशिनाथ अभंग यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी साहेबराव मनोेहर अभंग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा