अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याच्या कार्यपध्दतीवरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.
याच पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज ज्येष्ठ सामाजिक नेते अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे शुक्रवारी भेट घेतली.
ग्रामपंचायतीवरील प्रशासक नियुक्तीच्या कायद्यासह लोकसहभागातून ग्रामविकास व समृद्ध खेडी या विषयांवर यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली. दुपारी तीन ते चार या वेळेत तासभर ही बैठक सुरू होती.
सध्याची परिस्थिती आणि कायदेशीर माहिती ऐकल्यानंतर हजारे यांचे समाधान झाले. मात्र, ही नियुक्ती करताना पालकमंत्र्यांचा सल्ला ही अट नसावी, यावर आपण ठाम असल्याचे हजारे यांनी सांगितले.
यावर आता कोर्टाचा काय निर्णय येतो, यावर पुढील दिशा ठरविण्यावर दोघांची सहमती झाली. या वेळी आमदार नीलेश लंके,
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अॅड. राहूल झावरे, बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, काँग्रेसचे विनायक देशमुख, अॅड. श्याम असावा, बापू शिर्के,
प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, पोलिस निरीक्षक राजेंद्र गवळी, उपसरपंच सुरेश पठारे, माजी सरपंच जयसिंग मापारी, दत्ता आवारी आदी उपस्थित होते.
या भेटीनंतर पत्रकारांना माहिती देताना हजारे यांनी सांगितले की, ‘काही मुद्द्यांवर आपले समाधान झाले आहे. आपली अर्धी नाराजी दूर झाली आहे. मात्र, प्रशासक नियुक्तीत राजकारण येता कामा नये.
त्यामुळे गावांतील वातावरण ढवळून निघून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने नियुक्ती करायची म्हटले की, पालकमंत्री आमदारांना यादी मागणार, आमदार खालच्या पदाधिकाऱ्यांना मागणार,
येथे सर्वत्र आपल्या मर्जीतील, आपल्या पक्षाची माणसे निवडण्याचे काम होऊन त्यावरून वाद होतील, असे माझे मत आहे. हे मुश्रीफ यांनाही पटले आहे. त्यांनी कोर्टाच्या निकालानंतर यासंबंधी बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.’
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा