नगर: नगर शहरात कबाड गल्लीत पंचपीर चावडी, माळीवाडा परिसर येथे राहणारे वाहिद मेहबुब शेख उर्फ लाला कुरेशी, वय ३६ यांचा पुतण्या अम्मार याला आरोपींनी लहान मुलाच्या भांडणावरुन चापट मारली. तेव्हा वाहिद शेख उर्फ कुरेशी हे आरोपींना जाब विचारण्यासाठी गेले.
चापट का मारली? असे विचारल्यावरुन पाच आरोपींनी याचा विषय संपून टाकू, असे म्हणत धारदार चाकू व कोयत्याने डोक्यात, गळ्यावर, हातावर सपासप वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत वाहिद मेहबुब शेख उर्फ लाला कुरेशी हा जबर जखमी झाला असून या इसमाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे .
त्याने दिलेल्या फिर्यादीवरुन मारहाण करणारे आरोपी एजाज अलरीफ बागवान, वसीम अल्ट्रलरीफ बागवान, अदलरोप जानमहंमद बागवान, अमीन अब्दुलरोप बागवान, फिरोज बागवान, सर्व रा. माळीवाडा, पंचपीर चावडी, कबाड गल्ली, नगर यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री ९. ४५ वा. हा जिवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला, घटनास्थळी डिवायएसपी मिटके यांनी भेट दिली.
पोसई पूनम श्रीवास्तव या पुढील तपास करीत आहेत. यातील दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने नगर शहरात खळबळ उडाली आहे.