श्रीगोंदा :- राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या संचालकपदी ‘नागवडे’ कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार यांचीही संचालकपदी वर्णी लागली आहे. निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला.
राज्य साखर संघाचे दिवगंत अध्यक्ष शिवाजीराव नागवडे व संचालक स्व.माजी खासदार अंकुशराव टोपे यांच्या निधनाने साखर संघाच्या संचालक मंडळातील संस्थेच्या व्यवस्थापक समितीमधील सभासद साखर कारखाना प्रतिनिधी मतदारसंघातील दोन जागा रिक्त झाल्या होत्या.
या रिक्त जागांवरील संचालकांच्या निवडीसाठी संघाच्या संचालक मंडळाची माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि.23) पुण्यात बैठक झाली.या बैठकीला संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर,उपाध्यक्ष श्रीराम शेटे,आबासाहेब पाटील,’ज्ञानेश्वर’चे अध्यक्ष चंद्रशेखर घुले,कार्यकारी संचालक संजय खताळ यांच्यासह संचालक उपस्थित होते.
रिक्त झालेल्या दोन जागांसाठी ‘नागवडे’चे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार यांचेच अर्ज आल्याने या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. निवडीनंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागवडे व शेलार यांचा सत्कार केला.दरम्यान या निवडीमुळे तालुक्याला एकाच वेळी दोन संचालकपदे मिळाली आहेत.
राज्य साखर संघाच्या संचालकपदावर निवड झालेले राजेंद्र नागवडे हे ‘नागवडे’ कारखान्याचे अध्यक्ष असून जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आहेत. श्री तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठाण व श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तर ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे सचिव म्हणून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. या शिवाय महाराष्ट्र राज्य डिस्टीलरी असोशिएशनचे व तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे संचालक म्हणून ते सध्या काम पहात आहेत.
तर घनशाम शेलार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असून ‘नागवडे’ कारखान्याचे माजी संचालक आहेत.श्रीगोंदा येथील श्री स्वामी समर्थ ग्रामविकास प्रतिष्ठाणचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.श्रीगोंदा येथे सहकारी तत्वावरील रुग्णालयाचेही ते अध्यक्ष आहेत.
नागवडे व शेलार या दोघांच्याही समर्थकांनी निवडीनंतर आनंद व्यक्त केला.या निवडीबद्दल नागवडे व शेलार यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,माजी उपमुख्यमंत्री अजित पवार,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.बाळासाहेब थोरात,माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, ‘कुकडी’चे अध्यक्ष आ.राहूल जगताप,’नागवडे’ उपाध्यक्ष केशवराव मगर,कार्यकारी संचालक रमाकांत नाईक व संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे.
नागवडे व शेलार यांच्या निवडीमधील योगायोग..!
राज्य साखर संघाच्या संचालक मंडळावर निवड झालेले नागवडे व शेलार हे दोघेही ‘नागवडे’ कारखान्याचे आजी-माजी पदाधिकारी आहेत.! शेलार यांना कुकडी कारखान्याने राज्य साखर संघावर प्रतिनिधी म्हणून ठराव दिला होता.मात्र शेलार हे ‘नागवडे’ कारखान्याचे माजी संचालक आहेत.ते कुकडीच्या संचालक मंडळात आजपर्यंत प्रतिनिधीत्व करु शकले नाहीत.
राजेंद्र नागवडे हे ‘नागवडे’ कारखान्याचे अध्यक्ष आहेत. साखर संघावर निवडीसाठी दोघांना अनुक्रमे ‘नागवडे’ व ‘कुकडी’ कारखान्याचे ठराव असले तरी ते दोघेही ‘नागवडे’ कारखान्याचेच पदाधिकारी राहिले आहेत.नागवडे व शेलार यांच्या निवडीमधील हा एक योगायोगच म्हणावा लागेल !
- Ahilyanagar News : नगर अर्बन बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी मनोज मोतियानी यास अटक करत केली कोठडीत रवानगी
- महाराष्ट्रातील 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट ! महागाई भत्ता (DA) 55% करण्याबाबतचा शासन निर्णय ह्या तारखेला जाहीर होणार
- Ahilyanagar News : जिल्ह्याील वारंवार अपघात घडणाऱ्या ठिकाणी कायमच्या उपाययोजना कराव्यात, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या सूचना
- Ahilyanagar News : साईबाबांचा बदनामी करणारा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याविरोधात शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल
- Ahilyanagar News : श्रावण महिन्यात शनिचौथरा भाविकांसाठी पहाटे पाच ते सात वाजेपर्यंत दोन तास राहणार खुला