माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप वाकचौरे यांना अटक

Published on -

नेवासा: निवडणुकांमध्ये वाटप करण्याकरिता दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून कमिशनवर सुटे पैैसे देण्याचे आमिष दाखवत श्रीमंतांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या टोळीचा प्रमुख सूत्रधार नेवासा येथील माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप वाकचौरे याला शहर पोलिसांनी अटक केली.

शिवसेनेचा उपतालुका प्रमुख बिट्टू वायकर याला दिल्ली येथून सोमवारी ताब्यात घेतल्यानंतर त्यानेच पोलिसांना सूत्रधाराविषयी माहिती दिली. आरोपी वाकचौरे याला न्यायालयात हजर केले असता त्याची २६ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

या टोळीने महांकाळवाडगाव येथील कापसाचे व्यापारी चांगदेव अंबादास पवार यांना ७५ लाख रुपयांना पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले होते. गुन्ह्यातील १५ आरोपींना अटक करण्यात यश आले असले तरी अद्यापही ५ आरोपी फरार आहेत.

शहर पोलिसात पवार यांनी फिर्याद दिली होती. पिस्तूल व तलवारीचा धाक दाखवून त्यांना एमआयडीसी परिसरातून ५ जुलै रोजी लुटले होते.

याप्रकरणी राहुरी येथील सचिन उदावंत, राहुल उदावंत, सर्वेश प्रजापती (जळगाव), शैैलेश उर्फ विकी भंडारी (धुळे), राजेश शिंदे (नान्मज दुमाला, ता.संगमनेर), जितेंद्र पाटील (एरंडोल) यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती.

रविवारी दत्ता मोहन पन्हाळे (शिंदेवाडी, जि.पुणे), किरण काशिनाथ वेताळ (लोणी काळभोर), आशिष याकोब खरात (दौंड), अतुल जयसिंग जहाड (केडगाव चौफुला) व बिट्टू कृष्णा वायकर (श्रीरामपूर), दीपक इंगळे, सागर गंगावणे (श्रीरामपूर), सुनील नेमाणे (श्रीरामपूर) यांना दिल्ली येथून ताब्यात घेतले.

हा संपूर्ण कट दिलीप वाकचौरे यांनी रचला. सुनील नेमाणे व वाकचौरे हे जमिनीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार करीत होते. त्यांनी कट रचल्यानंतर टोळीतील इतरांचा त्यात सहभाग झाला. वाकचौरे यांना २८ लाख रुपये दिले जाणार होते.

गुन्हा चव्हाट्यावर आल्यास प्रकरण मिटविण्याचे आश्वासन वाकचौरे यांनी इतर आरोपींना दिले होते. ते माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. काँग्रेस पक्षाकडून २०१४ मध्ये त्यांनी नेवाशातून उमेदवारी केली होती. मात्र त्यांना अपेक्षित मते मिळाली नव्हती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News