थोडंसं मनातलं : गरजवंताला खरंच अक्कल नसते का ?” ॲड शिवाजी अण्णा कराळे

Published on -

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- नमस्कार मित्रहो
देशभर कोरोना नावाचा व्हायरस थैमान घालायला लागलाय. त्यामध्ये महाराष्ट्र एक नंबर वर आहे. अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील कोविड-19 चा प्रसार दिवसेंदिवस वाढतच आहे. आता केंद्र सरकारने अनलाॅकडाऊन 3 जाहीर केला आहे तर महाराष्ट्र शासनाने 31ऑगस्ट 2020 पर्यंत लाॅकडाऊन जाहीर केला आहे . सध्या तरी कोविड-19 ला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन पुर्ण पणे प्रयत्न करत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील काही खासगी हाॅस्पिटलला व शासकीय कोविड-19 चे रूग्णाची व्यवस्था केली आहे.

सध्या महाराष्ट्रात ” खाजगी हाॅस्पिटल चे वाढीव बिलाचे”  संदर्भात कोविड-19 च्या पेशंट व त्यांचे नातेवाईक यांनी सबळ पुराव्या सह काही खाजगी हाॅस्पिटल विरुद्ध अनेक तक्रारी सरकार व जिल्हा प्रशासन यांचे कडे केलेल्या आहेत. याच संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याच वाढीव बिलाचे लोण आता अहमदनगर शहरात पण पसरले आहे. बालिकाश्रम रोड वरील एका खाजगी हाॅस्पिटल मध्ये तेथील डाॅक्टर साहेब यांनी कोविड-19 च्या पेशंट ला फक्त  75 हजार रुपये पॅकेज संपूर्ण खर्च सांगितला आणि पेशंट ला सोडताना दिड लाख रुपयाचे बील दिल्याची बातमी कालच “नगर टाईम्स” मध्ये वाचण्यात आली. वास्तविक पाहता येथील डाॅक्टर साहेबांनी शासकीय दरा पेक्षा जास्त दर आकारला आहे असे पेशंट चे नातेवाईकांना देण्यात आलेल्या बिलावरून दिसते.

जर शासनाने एका साधारण बेडसाठी रुपये 2500/- दर दिवसासाठी आकारणी करण्याचा आदेश दिला असताना इतर खर्च म्हणजे पीपीई किट, सॅनिटायझर, नर्स  खर्च, मेडिसिन इत्यादी खर्च पेशंट कडूनच वसूल केले जातात. पीपीई किट तर जिल्हा प्रशासन पुरवितात असे परवाच औरंगाबाद येथील बैठकीत आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे साहेब यांनी सांगितले आहे. त्यामुळे कोणत्याही दवाखान्यात पीपीई किट, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज  चे बील पेशंट ने देऊ नये अशा सुचना व आदेशच दिले आहेत. तरीही असे अपप्रकार का केले जातात याकडे जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांनी जाणीव पुर्वक लक्ष देऊन कडक कारवाई केलीच पाहिजे.

सध्या अहमदनगर शहरात दवाखान्यांची परिस्थिती जीवघेणी झाली आहे. लाॅकडाऊन च्या अगोदर आणि लाॅकडाऊन च्या काळात सुध्दा अनेकदा खाजगी हाॅस्पिटल विरुद्ध नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. आता तर कोविड-19 च्या नावाखाली लुटालुट चालू असल्याचे बिनधास्त पणे बोललं जातंय. त्याचवेळी काही डाॅक्टर मंडळी  समाजमाध्यमावर “आम्ही आमचे जीव धोक्यात घालून पेशंट वाचवतो, त्यामुळे आम्ही लुटारू कसे काय होऊ शकतो ” अशा पोस्ट ही टाकतात. अहमदनगर शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था आणि ज्या डाॅक्टर साहेबांना सामाजिक जाणीव आहे त्यांनी एकत्र येऊन शहरातील वेगवेगळ्या भागात  कोविड-19 चे सेंटर सुरू केले आहेत आणि  तेथे रूग्णांवर विनामूल्य उपचार व सेवा दिली जाते. परंतु काही पेशंट स्वतः होउन खाजगी हाॅस्पिटल मध्ये दाखल होतात.

सध्या दररोज हा एकच विषय वेगवेगळ्या माध्यमातून लोकांचे समोर येत आहे. त्यामुळे जनता भयभीत झाली आहे. मग पेशंट व त्यांचे नातेवाईक पेशंट ला वाचवण्यासाठी डाॅक्टर साहेब जसा सल्ला  सांगतील तसेच करतात.  काय करणार? पुर्वी लोकं नेहमीच म्हणायचे की,  “गरजवंताला खरंच अक्कल नसते ” तशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु सध्या पेशंट च्या कोविड-19 च्या मेडिसिनच्या खर्चापेक्षा इतरच खर्च दुप्पट होतोय. म्हणजेच ” चार आण्याची कोंबडी अन् बारा आण्याचा मसाला” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु सरकारने या गोष्टी गांभीर्याने घेतल्या शिवाय हा प्रश्न मार्गी लागेल असे वाटत नाही. अहमदनगर शहरातील व जिल्ह्यातील जे चॅरिटेबल हाॅस्पिटल आहेत तिथे कोविड-19 च्या पेशंट ची व्यवस्था केली पाहिजे.

तसेच अहमदनगर मधील खरंच काही खासगी हाॅस्पिटलला व डाॅक्टर साहेब यांना सामाजिक भावनेची जाण आहे तिथेच कोविड-19 चे पेशंट रेफर करणे आवश्यक आहे. खरं तर अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील सर्व शासकीय व खाजगी हाॅस्पिटल यांचेवर जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांचे नियंत्रण असते. जर शहरातील काही खासगी हाॅस्पिटल पेशंट ला अशा प्रकारची वागणूक देत असतील तर महापालिका प्रशासन यांनी गंभीर बाब म्हणून दखल घेतली पाहिजे व गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे तरच काही प्रमाणात हा प्रश्न मार्गी लागेल असे वाटते आहे. सध्याच्या काळ हा फार भयानक आहे. लाॅकडाऊन असल्याने अर्थिक घडी विस्कळीत झाली आहे.

त्यामुळे लोकांकडे अर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत हे पण सत्य आहे. तसेच कधी कधी एकाच घरातील चार पाच पेशंट कोविड-19 ची लागण झालेली सापडतात. अर्थिक अडचणी मुळे कदाचित हे पेशंट दवाखान्यात जाणार नाहीत आणि त्याचा परिणाम म्हणून अनेक कोविड-19 चे रूग्ण निर्माण होतील आणि लवकरच शहरात कोरोना बाधीत रूग्ण मोठ्या प्रमाणात  सापडले जातील. महापालिका प्रशासन यांनी कोविड-19 साठी शहरातील कोणते खासगी हाॅस्पिटल निश्चित केले आहेत त्या दवाखान्यांची यादी जनतेच्या माहिती साठी वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली पाहिजे.

तसेच ज्या खाजगी हाॅस्पिटलला शासकीय दरातच कोविड-19 चे रूग्णाची व्यवस्था करणे शक्य आहे त्यांची एक बैठक आयोजित करून जनतेला त्याची माहिती करून दिली पाहिजे. वास्तविक आता शहरातील जनता कोविड-19 पेक्षा त्याचे  भितीनेच जास्त प्रमाणात सैरभैर झाली आहे. सध्या जनता मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबियांची गुजराण करत आहेत. अशा परिस्थितीत खाजगी हाॅस्पिटल ने जनतेची दिशाभूल करून अर्थिक लूट थांबवली पाहिजे. जनतेला आजही डाॅक्टर साहेब देवापेक्षा कमी वाटत नाहीत म्हणून तर आपले डाॅक्टर साहेब सांगतील तसेच लोक करतात आणि वागतात हे सुद्धा नाकारता येणार नाही. जर आपण डाॅक्टर चे ऐकले नाही तर आपल्या जीवाचे काही बरे वाईट होण्याची भिती सुद्धा पेशंट ला असतेच. त्यामुळे त्या पेशंट ची परिस्थिती “इकडे आड अन् तिकडे  विहीर” अशी होते.

अनेक खाजगी  दवाखान्यात पेशंट वर चुकीचे उपचार केल्यानंतर पेशंट ला अपाय झाला म्हणून “जिल्हा ग्राहक तक्रार मंच” यांचे न्यायालयात तक्रारी दाखल केल्या आहेत. डाॅक्टर च्या चुकी मुळे जर एखादा रूग्ण दगावला तर त्याचे नातेवाईक हाॅस्पिटल ची तोडफोड करतात व कधी कधी डाॅक्टरनां सुद्धा मारहाण केल्याचे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. तेव्हा डाॅक्टर असोसिएशन ची “डाॅक्टर संरक्षण कायदा” करण्याची  मागणी सरकारने मान्य केली आहे. या सगळ्या गोष्टीचा उहापोह करण्याचा उद्देश एकच आहे की, या भयानक परिस्थितीत खाजगी हाॅस्पिटल यांनी शासकीय नियमाचे व आदेशाचे काटेकोर पालन करून योग्य तीच बीले कोविड-19 च्या पेशंट कडून वसूल करावीत हिच विनंती आहे.

जर काही खासगी हाॅस्पिटलला कोविड-19 ची सेवा शासकीय दरात  उपलब्ध करून देणे खरंच शक्यच नसेल तर त्या हाॅस्पिटल ने तसे लेखी स्वरुपात महाराष्ट्र सरकार आणि जिल्हा  प्रशासन यांना कळवायला हरकत नाही, कारण स्वतंत्र व्यवसाय कसा करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. एक मात्र निश्चितच आहेकी, जर काही खासगी हाॅस्पिटल कडून अशीच परिस्थिती यापुढेही कायम राहिली तर जनतेमध्ये उद्रेक निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही याची दखल सुद्धा प्रशासनाने घेतली पाहिजे.

सध्या “आभाळच फाटलंय तर ठिगळ तरी कुठे कुठे लावायचे” असा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिक हो अजुन ही भय संपले नाही याची जाणीव असू द्या हिच अपेक्षा. तुम्ही तुमच्या कुटुंबियांसाठी फार महत्वाचे आहात. त्यामुळे काळजी घ्यावी. शासकीय आदेश पाळूनच घराबाहेर जावे अन्यथा घराबाहेर पडू नये हि विनंती. घरीच रहा सुरक्षित रहा.

धन्यवाद.
ॲड शिवाजी अण्णा कराळे
सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर
99 22 545 545

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

 

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!