अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- जामखेड तालुक्यात एका विवाहितेने तिच्या तीन मुलींसह विहिरीत आत्महत्या केल्याची घटना घडली होती या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तिसरीही मुलगी झाल्याने सासरच्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून महिला व तिच्या तीन मुलींनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली, अशी फिर्याद मृत मुलीच्या आईने दाखल केल्याने पोलिसांनी पती, सासू व सासरे यांच्यावर गुन्हा दाखल केला.
पतीस अटक करण्यात आली. मृत स्वाती कार्ले यांची आई शोभा वाल्मिक वाघ (बाळगव्हाण, ता. जामखेड, हल्ली गुजरात) यांनी फिर्याद दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, मुलगी स्वातीचे लग्न कुसडगाव येथील राम दिनकर कार्ले याच्याबरोबर २००७ मध्ये झाले होते. तिसरी मुलगी झाल्यापासून तिला वेळोवेळी उपाशीपोटी ठेवून आम्हाला मुलगा हवा आहे, म्हणून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला जात होता.
स्वाती व तीन मुलींनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे मुलीच्या आई-वडिलांना रविवारी सायंकाळी कळवण्यात आले. त्यांनी आम्ही अहमदाबादवरून निघतो. आम्ही येईपर्यंत शवविच्छेदन करू नका, असे सांगितले.
सोमवारी आई-वडील व नातेवाईक आल्यावर त्यांनी सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केल्याशिवाय शवविच्छेदन करू नका, असा पवित्रा त्यांनी घेतला.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक सागर पाटील, उपअधीक्षक संजय सातव, निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सायंकाळी सातच्या सुमारास फिर्याद दाखल केल्यानंतर कुसडगाव येथे रात्री उशिरा अंत्यविधी करण्यात आला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा