अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- भाजप सरकारच्या काळात ५ वर्षे चांगली सुरू असलेल्या महात्मा फुले जीवनदायिनी आरोग्य योजनेची विमा कंपनी विद्यमान महाविकास आघाडी सरकारने का बदलली याचे उत्तर आधी दिले जावे तसेच ही कंपनी आल्यापासून माझ्याच विखे हॉस्पिटलची सुमारे ६ कोटीची रखडलेली उधारी आधी द्यावी, अशी मागणी नगरचे खासदार डॉ.सुजय विखे यांनी शनिवारी येथे केली.
महात्मा फुले जीवनदायिनी योजनेतून केलेल्या अँजिओप्लास्टी व अन्य वैद्यकीय उपचारांचे पैसे विमा कंपनी बदलल्यामुळे मागील ३ महिन्यांपासून मिळालेले नाहीत, कोरोनामुळे महापालिका हद्दीतील प्रसुती सेवा मी विखे हॉस्पिटलद्वारे दिली, सिझरला १९ हजार व नॉर्मल डिलेव्हरीला ९ हजाराप्रमाणे आकारणी केली,
पण त्या १५० ते २०० प्रसुतींच्या ५० लाखाच्या रकमेपैकी १ रुपयाही सरकारकडून मिळालेला नाही, त्यामुळे महात्मा फुले जीवनदायिनी योजनेतून केलेल्या उपचारांचे पैसे देण्याची शाश्वती महाविकास आघाडी सरकारने आधी द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली.
राज्य सरकारने खासगी रुग्णालयांमध्ये केल्या जाणाऱ्या उपचारांची तसेच आकारल्या जाणाऱ्या बिलांच्या तपासणीसाठी भरारी पथके नेमण्याची बाब योग्य आहे, याबद्दल कोणाचेही दुमत नाही. मात्र, या चौकशीमध्ये या रुग्णालयांमध्ये खरी काय स्थिती आहे, रुग्णांना तेथे उपचार मिळतात की नाही किंवा संबंधित रुग्णाला खरेच उपचार गरजेचे आहेत का, याची शहानिशा गरजेची असल्याचे आपले मत आहे.
या भरारी पथकाच्या तपासणीची सुरुवात माझ्या रुग्णालयापासून जरी केली तरी माझी हरकत असणार नाही, असे स्पष्ट करून ते म्हणाले, खासगी रुग्णालयांमध्ये दर जास्त घेतले जातात, असे बोलले जात असले तरी दुसरीकडे आज कर्मचारी मिळत नाही, डॉक्टर मिळत नाहीत,अशी स्थिती आहे.
त्याचे कोण नियोजन करणार. अनेकजण काम करायला तयार नाही. सगळ्यांना दर पंधरा दिवसांनी पगार दिला जातो, म्हणून हा गाडा चालवायचा कसा, याचाही विचार केला पाहिजे. अर्थात अवाजवी बिल आकारणी झाली असेल तर ती बाब दुर्दैवी आहे, असेही विखे स्पष्ट केले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved