अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :-वाघोली (जि. पुणे) येथे स्वस्तात जागा मिळण्याचे अमिष तालुक्यातील शैक्षणिक संकुलाच्या संचालकाला चांगलेच महागात पडले. या व्यवहारात कर्जुले हर्या येथील मातोश्री शैक्षणिक संकुलाचे संचालक किरण आहेर यांची पाच कोटी रुपयांची फसवणूक झाली.
किरण आहेर यांनी पारनेर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी या व्यवहारातील दोन दलालांसह एकूण पाच परप्रांतीय व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला. जमीन व्यवहारातील दलाल भुवनेश्वर कुमार साल व अजयसिंग (दोघेही रा.चंदीगढ), विशाल चव्हाण (रा. दिल्ली),
अशोक भोपालसिंग चौधरी व जिमी अशोक चौधरी (दोघेही रा. उत्तर प्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. यासंदर्भात किरण आहेर यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी भुवनेश्वर साल व विशाल चौधरी यांच्या सांगण्यावरून वाघोली (पुणे) येथील जमिनीच्या व्यवहारापोटी तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील स्टेट बँकेच्या शाखेतून,
मातोश्री शैक्षणिक संस्थेच्या खात्यावरून पाच कोटी रुपयांचा धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) काढला. या धनाकर्षाची छायांकित प्रत आरोपी अजय सिंह यांना इमेलद्वारे पाठवली. हा प्रकार ११ फेब्रुवारी २०२० रोजी घडला. आरोपींनी या इमेलद्वारे पाठवलेल्या धनाकर्षाच्या छायांकित प्रतीवरून बनावट धनाकर्ष तयार केला.
त्याच्यावर टाकळी ढोकेश्वर शाखेच्या अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या केल्या. हा बनावट धनाकर्ष आरोपींनी १५ फेब्रुवारी २०२० रोजी उत्तर प्रदेशातील बिजनोर येथील आयडीबीआय बँकेच्या शाखेत वटवला. दरम्यान जमिनींचा व्यवहार पूर्ण करण्यास मात्र आरोपींनी टाळाटाळ केली.
पैसे परत करण्यासही टाळाटाळ केली. मूळ धनाकर्ष फिर्यादी किरण आहेर यांच्याकडे असताना बनावट धनाकर्ष तयार करून आरोपींनी आहेर यांची फसवणूक केली व पाच कोटी रुपयांचा अपहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved