अहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या संकट काळात राज्यासह केंद्र सरकार अनलॉककडे जात आहे. शासकीय नियमावलीचे पालन करत सर्व उद्योग, व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळालेली असल्याने श्रीरामपूर नगरपालिकेने मेनरोडवरील स्टॉल धारकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या अटीवर नगरपालिकेने परवानगी द्यावी.
अशी मागणी जनविकास आघाडीच्या जिल्हा नियोजन समिती सदस्या, नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे, नगरसेविका वैशाली दीपक चव्हाण, शितल आबासाहेब गवारे, नगरसेवक जितेंद्र छाजेड, दीपक बाळासाहेब चव्हाण, संतोष कांबळे यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिका-यांकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात जनविकास आघाडीच्या नगरसेवकांनी म्हटले आहे की, गेल्या पाच महिन्यांच्या लॉकनडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनकडून अनलॉककडे जाताना सर्व क्षेत्रातील उद्योग,
व्यवसाय सोशल डिस्टन्सिंग पाळत सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे विस्कटलेली आर्थिक घडी बसविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे दिसते. कोरोनाचे संक्रमण वाढू नये म्हणून नियमांची कडक अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
सर्व उद्योगधंदे व व्यवसाय सुरू करण्यास परवानगी असताना श्रीरामपूर नगरपालिकेने दरवर्षी मेनरोडवर लागणाऱ्या रक्षाबंधन स्टॉलला परवानगी नाकारणे दुर्दैवी आहे.
त्यामुळे दररोजच्या कमाईवर पोट भरणाऱ्या गरीब, मध्यमवर्गीय स्टॉलधारकांवर मोठा अन्याय होऊन त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. पुढील काळात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी, ख्रिसमस, मकर संक्रांत ते राम-रहीम उत्सवासह अनेक उत्सव येऊ घातले आहे.
नगरपालिकेने स्टॉल्सबाबत आपली भूमिका स्पष्ट केल्यास अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांना विविध प्रकारच्या स्टॉल्सचा माल भरता येणार आहे.
नगरपालिकेने मेनरोडवरील स्टॉलधारकांना सापत्न वागणूक न देता सकारात्मक भूमिका ठेवल्यास बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होऊन छोट्या व्यावसायिकांना उदरनिर्वाह करणे सोपे होणार असल्याचे जनविकास आघाडीच्या नगरसेवकांनी म्हटले आहे.
अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यात लॉकडाऊनची गरज नसल्याचे जाहीर केले आहे. मेनरोडवर लागणारे स्टॉल्स तातपुरत्या स्वरूपाचे असल्याने कोरोनाचे संक्रमण वाढू नये म्हणून दोन स्टॉल्समध्ये अंतर ठेवणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे,
परिसर नियमित सॅनिटायझेशन करणे अशा विविध उपाययोजना नगरपालिकेच्या माध्यमातून राबवून स्टॉल धारकांना परवानगी देता येऊ शकेल.
रक्षाबंधनच्या स्टॉल्सला परवानगी नाकारल्याने अनेक स्टॉलधारकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना नुकसानभरपाई नगरपालिका प्रशासन देणार का ?
सामान्य छोट्या व्यावसायिकांच्या स्टॉलला परवानगी नाकारून कोरोनाचे संक्रमण थांबणार आहे का ? शासकीय नियमांचे पालन करत.
पुढील काळात स्टॉलधारकांना परवानगी देणे आवश्यक असल्याची मागणी जनविकास आघाडीचे नगरसेवक दीपक बाळासाहेब चव्हाण, जितेंद्र छाजेड, संतोष कांबळे, नगरसेविका शितल आबासाहेब गवारे, वैशाली दीपक चव्हाण, जिल्हा नियोजन समिती सदस्या, नगरसेविका स्नेहल केतन खोरे यांनी केली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved