लातूर :- प्रियकराने दिलेला धोका आणि त्यातून आलेले नैराश्य यामुळे एका १७ वर्षीय तरुणीने चौथ्या मजल्यावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला , गुरुवारी रात्री औसा रोडवर तब्बल दोन तास हा थरार सुरु असताना अत्यंत चपळाईने पोलिसांनी घेतलेली अॅक्शन आणि मदतीला आलेली अग्निशमन विभागाची यंत्रणा यामुळे तिला वाचविण्यात यश आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की लातूर शहरातील औसा रोडवर रेमंड शो रुमच्या शेजारी सुभाष सोमानी यांच्या मालकीची चार मजली इमारत असून या इमारतीचे बांधकाम सुरु आहे . तळमजल्यावर एक वॉचमन सोडला तर या इमारतीत रात्री कोणीच वास्तव्यास रहत नाही.
गुरुवारी ( दि . १७ ) रात्री ९ वाजेच्या सुमारास एक १७ वर्षीय तरुणी हातात दप्तर घेवून अंधारात या इमारतीच्या पायऱ्या चढत गेल्याचे वॉचमनने पाहिले आणि त्याने तिला थांबविण्याचा प्रयत्न केला . परंतू त्याला दाद न देता तिने इमारतीचा चौथा मजला गाठला. या इमारतीच्या मागच्या बाजुला शेवटच्या टोकावर ही तरुणी दोन्ही पाय खाली सोडून बसली आणि रडू लागली.
घटनेची माहिती वॉचमनने मालकांना दिली आणि मालकांनी पोलिसांना. तो पर्यंत या इमारतीच्या शेजारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला आणि बघता – वधता हजारो लोकांची गर्दी औसा रोडवरील वा इमारतीच्या भोवती जमा झाली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधिक्षक सचिन सांगळे यांनी अत्यंत चपळाईने इमारतीचे छत गाठले आणि तो पर्यंत खाली थांबलेल्या पोलिस अधिका – यांना माईकवरुन तिच्याशी बोलण्यात गुंतवले. तिने काही मोबाईल नंबर पोलिसांना सांगितले आणि त्याला व्हिडीओ कॉल करा आणि मी आत्महत्या करीत असल्याचे सांगा, असा तिने निरोप दिला. हा नंबर तिच्या प्रियकराचा होता.
प्रेमभंगातून आलेल्या नैराश्येतून आपण आत्महत्या करणार असल्याचे ती वारंवार सांगत होती. यावेळी या इमारतीच्या शेजारी शेकडो बघ्यांनी गर्दी केल्यामुळे परिसराला जत्रेचे स्वरुप आले होते ; पोलिसांसोबतचा संवाद सुरु असतानाच अग्निशमन विभागाच्या कर्मचा – यांनी या इमारतीच्या खाली जाळीचे अच्छादन तयार केले.
खाली थांबलेल्या पोलिसांनी तिच्यावर टॉर्च लावून तिच्या हालचालींवर नजर ठेवली होती तर काही अधिकारी स्पिकरवरुन तिला बोलण्यात गुंतवून ठेवत होते , इतक्यात अंधारात दबा धरुन बसलेल्या पोलीस उपाधिक्षक सांगळे यांनी मागून तिच्यावर झडप घातली आणि तिला ताब्यात घेतले.
महिला पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि पोलिसांनी तिला पोलीस जिपमधून शिवाजी नगर पोलिसांत नेण्यात आले आणि तिची बाजू ऐकुन घेतली. तेव्हा तिने हा प्रकार प्रेमभंगातून केल्याचे सांगीतले. नगर ज़िल्ह्यातील ही तरुणी मागील आठ महिण्यांपासून शिक्षणासाठी लातुरातीलं एका हॉस्टेलवर वास्तव्यास आहे. घडलेला हा प्रकार पोलिसांनी तिच्यां पालकांच्या कानावर घातला असून सध्या तिला पोलिसांच्याच ताब्यातं ठेवण्यात आले आहे .