अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- काँग्रेसचे अध्यक्षपद कोणाला द्यावे या वरून काँग्रेस पक्षात दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आणि युवा नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून आपली भूमिका कळवली आहे. आता अध्यक्षपदावरून पक्षातला वाद पेटला आहे.
काँग्रेस नेते आणि महाविकासआघाडीतील मंत्री सुनिल केदार यांनी पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांच्यावर टीका केली आहे. `काँग्रेसमध्ये दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत बदल झाले पाहिजेत,` अशी मागणी करणारं पत्र काँग्रेसच्या २३ नेत्यांनी लिहिलं आहे.

यामध्ये महाराष्ट्रातून पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांच्या नावाचा समावेश आहे, यानंतर सुनिल केदार यांनी या तिन्ही नेत्यांवर बोचरी टीका केली आहे. गांधी कुटुंबियांवर प्रश्न उपस्थित करणार्यांना पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांना लाज वाटली पाहिजे.
त्यांनी या कृत्याबद्दल तात्काळ माफी मागावी. माफी मागितली नाही तर हे तीन नेते राज्यात कसे फिरतात ते काँग्रेसचे कार्यकर्ते बघून घेतील. गांधी घराण्याचे नेतृत्व असेल तरच काँग्रेस भाजपला टक्कर देऊ शकतो. सोनिया गांधी यांच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याची हीच वेळ आहे, असं ट्विट सुनिल केदार यांनी केलं आहे.
महाराष्ट्र काँग्रेसने एक ठराव केला आहे त्यामध्ये `सोनिया गांधींनीच पक्षाचं अध्यक्ष असावं. सोनिया गांधी तयार झाल्या नाहीत, तर राहुल गांधींनी पक्षाध्यक्ष पद स्वीकारावं, अशी मागणी केली आहे. तर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि
अशोक चव्हाण यांनी राहुल गांधींनी अध्यक्ष व्हावं, अशी मागणी केली आहे. काँग्रेसमधल्या नेत्यांच्या पत्रानंतर सोनिया गांधी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. मात्र, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मात्र या वृत्ताचं खंडन केलं आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved