अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- भाजपचे नगरचे माजी खासदार दिलीप गांधी यांचे सख्खे मेहुणे अमृतलाल गुगळे यांनी गांधी यांच्याच एका समर्थकाच्या स्टेशन रोडवरील आगरकर मळा परिसरातील घराच्या दारासमोर दोन दिवसांपासून सुरू केलेले आंदोलन नगरमध्ये चर्चेत आहे.
संबंधित समर्थकाने गुगळे (वय ७२) यांची आर्थिक फसवणूक केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांचे हे आंदोलन व्हॉटसअॅप व सोशल मिडियातून जोरदार व्हायरल झाले आहे. बार्शी येथे प्रतिष्ठित व्यापारी म्हणून प्रसिद्ध असलेले अमृतलाल गुगळे माजी खासदार गांधी यांचे मेहुणे आहेत.
त्यांच्या झालेल्या फसवणुकीबद्दल दिलेली माहिती अशी की, गुगळे हे बहिणीकडे (गांधी यांच्याकडे) राखी पौर्णिमेला २५ रोजी आले होते, त्या ठिकाणी गांधी यांचा हा समर्थक त्यांना भेटला. तो त्यांना म्हणाला, तुम्ही माझ्या घरी चला, त्याच्याशिवाय बार्शीला जाऊ नका, असे सांगितले. त्याच्या हट्टामुळे गुगळे त्याच्या घरापाशी आले.
संबंधित समर्थकाने गुगळे यांना तुमच्या गळ्यामध्ये सोन्याची चेन आहे, तशी माझ्या मित्राला करायची असल्यामुळे मी त्याला ती दाखवून आणतो, असे सांगितल्याने गुगळे यांनी त्यांच्या गळ्यातील असलेली सोन्याची तीन लाख रुपयांची चेन त्याला दिली. समर्थकाने ती घेऊन तेथून पोबारा ठोकल्याचे गुगळे यांचे म्हणणे आहे.
त्यांनी त्याला संपर्क केला असता संबंधित समर्थकाने तोपर्यंत थेट पोलिस ठाण्यांमध्ये धाव घेऊन गुगळे यांनी मला दमदाटी केल्याची तक्रार दाखल केल्याचे त्यांना समजले. नंतर नगरच्या कोतवाली पोलिसांनी या घटनेची माहिती घेतली व गुगळे यांना विचारणा केली असता
त्यांनी सांगितले की, मी पोलिसात तक्रार करणार नाही, पण जोपर्यंत मला माझी सोन्याची चेन मिळत नाही, तोपर्यंत मी त्या व्यक्तीच्या घरासमोर बसून राहणार आहे, ही माझी भूमिका आहे असे सांगितले व मागील ४८ तासापासून त्याच्या घरासमोर त्यांनी बसकण ठोकली आहे.
समर्थकाने केलेल्या फसवणुकीची मेहुणे, बहीण, भाचे यांनी साधी दखलही घेतली नसल्याचे दुःखही त्यांनी व्यक्त केले. हे सांगताना त्यांचे डोळेही भरून आले. जोपर्यंत मला माझी सोन्याची चेन मिळत नाही, तोपर्यंत मी या ठिकाणाहून हलणार नाही. मी कोणत्याही प्रकारची कोणाची तक्रारही करणार नाही.
मला माझी वस्तू द्या, ही माझी भूमिका आहे. मला माझी नेलेली वस्तूच पाहिजे. हा विषय आता मैत्रीचा व नात्याचा राहिला नाही तर तो तत्त्वाचा झाला आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. दरम्यान, या आंदोलनात गुगळे यांनी खासदार साहेबांचा विजय असो, असा फलकही लावला असल्याने सोशल मिडियातून तोही चर्चेचा झाला आहे.
बातमी : amcmirror.com
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved