अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यासाठी मुळा धरण वरदान आहे. लाखो लोकांची आणि हजारो हेकटर जमिनीची तहान हे धरण भागवत आलेले आहे. 1972पासून या धरणात पाणी साठा होत आलेला आहे.
परंतु या धरणाबत अनेक धक्कादायक खुलासे आणि त्यावर करावयाचे उपाय याबाबत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे वडील माजी खा. प्रसाद तनपुरे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, मुळा धरणातील पाण्याचा अकृषक कामासाठी वापर वाढलेला आहे.
जवळपास दोन टीएमसी पाणी क्षमता कमी करेल इतका गाळ त्यात आहे. हे प्रकार वाढत गेले तर भविष्यात सिंचनासाठी योग्य प्रमाणात पाणी मिळेल की नाही अशी चिंता लागून राहिली आहे.
यासाठी धरणातील गाळ काढून दोन टीएमसी क्षमता पुनर्स्थापित करणे, पश्चिमेला समुद्राकडे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविण्याचा शासनाचा निर्णय आहे, त्याची लवकर अंमलबजावणी करून, साडेचार टीएमसी पाणी धरणात आणणे, हेच उपाय आहेत.
त्यादृष्टीने आताच पावले उचलावी लागतील, असे मत माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी व्यक्त केले. तनपुरे म्हणाले, मागील 48 वर्षांत धरणात माती, वाळू, दगड असा गाळ साचत आहे. सध्या धरणात दोन टीएमसी गाळ झाला असू शकतो.
एकेकाळी अग्रक्रम असलेल्या सिंचनाला आता शेवटचा प्राधान्यक्रम आहे. अकृषक पाणीवापर वाढल्याने, सिंचनासाठी धरणातून 50 टक्के पाणी मिळते.
सिंचनाचे पाणी पुनर्स्थापित करण्यासाठी शासनाला आताच पावले उचलावी लागतील, असे सांगून तनपुरे म्हणाले, धरणातील गाळ काढून, दोन टीएमसी पाणी वाढल्यास, लाभक्षेत्रातील 11 हजार हेक्टरचे पाणी पुनर्स्थापित होईल. गाळ काढण्याची प्रक्रिया 10 ते 15 वर्षे चालेल असेही ते म्हणाले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved