जामखेड : जामखेड दुष्काळातून बाहेर निघण्यासाठी आधुनिक पद्धतीने शेती करण्याची गरज आहे. त्यासाठी बारामतीच्या धर्तीवर कृषी विज्ञान मार्गदर्शन केंद्र जामखेडमध्ये व्हावे. जामखेडकरांनी या केंद्रासाठी शंभर एकर जमीन द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील नागेश विद्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते. आमदार दिलीप वळसे, माजी आमदार दादा कळमकर, ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, रयतचे पदाधिकारी भगीरथ शिंदे, अरुण कडू, मीना जगधने, राजेंद्र फाळके, रोहित पवार, प्राचार्य संपत काळे, घनश्याम शेलार, भाऊसाहेब कराळे, रावसाहेब म्हस्के, संजय नागपुरे, मंजूषा गुंड, अभिषेक कळमकर, राजेंद्र कोठारी, मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे यांच्यासह स्थानिक स्कूल कमिटीचे पदाधिकारी, शिक्षक व नागरिक या वेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील व दादा पाटलांनी दुष्काळी परिसरात फिरून सर्वसामान्यांसाठी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवली. यात जामखेड येथील उत्तमचंद गुगळे, लोहकरे, डॉ. रजनीकांत आरोळे, कोठारी यांच्यासह जिल्ह्यातील अनेकांनी सहकार्य केले. रयतने कधीही शिक्षणाचा व्यापार मांडला नाही. प्रवेशासाठी डोनेशन घेतले नाही. खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून शिक्षण दिले. रयत ही आत्मविश्वास निर्माण करणारी संस्था आहे.