अकोले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अकोल्याच्या महाजनादेश यात्रेचे ग्रहण सुटायचे नाव घेत नाही. महाजनादेश यात्रा आधी १८ ऑगस्टला येणार होती, जलप्रलयामुळे मुख्यमंत्र्यांनी दौरा तातडीने रद्द केला होता. आता पुन्हा फडणवीस महाजनादेश यात्रेला निघाले आहेत.
अकोल्यातील हा दौरा बुधवारी (२१ ऑगस्ट) व नंतर त्यातही बदल करून शनिवारी (२४ ऑगस्ट) ठेवण्यात आला होता. पण आता हा दौरा रविवारी (२५ ऑगस्ट) ठेवण्यात आला आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी माजी मंत्री मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांनी अमृतसागर सहकारी दूध उत्पादक संघाच्या कार्यालयात नियोजनाची बैठक घेतली.
या दौऱ्यासाठी तालुक्यात पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. भाजपच्या नव्या व जुन्या कार्यकर्त्यांचा मेळ घालण्याचाही प्रयत्न केला जात आहे. नव्याने झालेल्या बदलाबद्दल बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.