अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- संगमनेर तालुक्याच्या पठारातील जवळे-बाळेश्वर येथील टाकेवाडी पाझर तलावात तुषार सुभाष दिवटे (२७, मिर्झापूर, ता संगमनेर) या तरुणाचा मृतदेह सोमवारी आढळला.
त्याच्या भावाने तक्रार दिल्याने मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तुषार एकटाच रहात होता.
त्याचे कुटुंब कामानिमित्त (हिंजवडी, ता. मुळशी. जि. पुणे) येथे राहते. दोन दिवसांपासून तुषारशी संपर्क होत नसल्याने नातेवाईकांनी रविवारी तालुका पोलिसात तक्रार दिली.
सोमवारी तुषारचा मृतदेह तलावात आढळला. हा घातपाताचा प्रकार असल्याचे सांगत कुटुंबीयांनी मृतदेह घेण्यास नकार दिला. पोलिसांनी समजूत घालून प्रकरण निवळले.
अजित सुभाष दिवटे याने फिर्यादीत म्हटले की, सुनील कुंडलिक घोडे, अनिल कुंडलिक घोडे (मिर्झापूर), माउली सावळेराम उगले (पिंपळगाव माथा),
सुरेश भांगरे, दिनकर भांगरे यांच्यासमवेत तुषार पाझर तलाव परिसरात फिरला. हे सर्वच दारू प्यालेले असल्याने जीवितास धोका होईल, हे माहिती असतानाही ते तलावाकडे गेले. पोलिसांनी एकास ताब्यात घेतले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved