राज्याचा महाविकास आघाडी पॅटर्न प्रथमच अहमदनगर महानगरपालिकेतही !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- महापालिकेच्या राजकारणात स्थानिक पातळीवर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुरबुरी असल्याने दोन्ही पक्षांच्या राज्यस्तरीय नेत्यांनी ही निवडणूक हाताळली.

शिवसेनेचे उमेदवार योगीराज गाडे यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार मनोज कोतकर यांची सभापतिपदी बिनविरोध निवड झाली.

स्थायी समिती सभापतिपदासाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता ऑनलाइन सभा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आली होती.

या निवडणुकीत भाजपकडून मनोज कोतकर यांचे नाव आघाडीवर होते. महिनाभरापासून जोरदार मोर्चेबांधणी सुरू होती. परंतु कोतकर यांनी गुरुवारी अचानक भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीबरोबर घरोबा केला.

राज्य सरकारमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र असले, तरी स्थानिक पातळीवर शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये कुरबुरी आहेत.

राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडू नये, यासाठी राष्ट्रवादीने मनोज कोतकर यांचा प्रवेश घडवून आणला,

तर दुसरीकडे शुक्रवारी सकाळी मुंबईतील शिवसेनेचे सचिव व वरिष्ठ नेते मिलिंद नार्वेकरांनी गाडेंना माघार घेण्याची सूचना दिली. त्यामुळे स्थानिक पातळीवर राज्याचा महाविकास आघाडी पॅटर्न प्रथमच राबवल्याचे स्पष्ट झाले.

सभापती निवडीची सभा सुरू झाल्यावर गाडे यांनी वरिष्ठांच्या सूचनेनुसार माघार घेतली. त्यामुळे कोतकर यांची बिनविरोध निवड झाली.

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते कोतकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार संग्राम जगताप, मनपाचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, तसेच शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर अन्य नगरसेवक आदी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment