अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-आईची स्वतःच्या लेकारांवर किती आफाट माया असते याचा प्रत्यय पुन्हा एकदा सोमवारी सकाळी आला. शेततळ्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा आक्रोश तिच्या कानावर गेला व हातातले काम सोडून तिने शेततळ्याकडे धाव घेतली.
दम लागल्यामुळे बुडत असलेला पोटचा गोळा पाहून तिचे मन हेलावले. पोहता येत नसतानाही मागचा पुढचा कोणताही विचार न करता तिने पाण्यात झोकून दिले.घाबरलेल्या मुलाने तिला व त्याच्या सोबत पोहत असलेल्या त्याच्या चुलत भावाला कवटाळले. त्यात ते तिघेही बुडू लागलेे.
तिघांचा आक्रोश ऐकून रस्त्यावरील लोकांनी शेततळ्याकडे धाव घेत आईला व चुलत भावाला पाण्याबाहेर बाहेर काढले. दम लागल्यामुळे तिच्या पोटचा गोळा मात्र तोपर्यंत पाण्यात बुडाला होता.लोकांनी शर्थीचे प्रयत्न करून त्याला बाहेर काढले परंतू तोपर्यंत तो गतप्राण झाला होता.
मुलास वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतलेली त्याची आई व त्याचा चुलत भाऊ देखील नाका तोंडात पाणी गेल्यामुळे बेशुद्ध झाले. अंगावर शहारे आणणारा हा थरार पारनेर तालुक्यातील रांजगणगांवमशिद येथे सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला.
तालुक्यातील रांजणगांव मशिद येथे सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या राहूल रामदास जवक या १३ वर्षीय शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला. त्यास वाचविण्यासाठी गेलेली त्याची आई राणी जवक तसेच चुलत भाऊ ॠतीक हे देखील नाका तोंंडात पाणी गेल्यानमुळे बेशुद्ध पडले होते.
त्यापैकी राणी जवक यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून ॠतीक अद्यापही बेशुद्ध अवस्थेत असल्याचे राहुलचे वडील रामदास जवक यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved